कोपरगाव : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळूची तसेच इतर गौणखनिजाची २०१४ ते २०१९ या कालावधीत तहसीलच्या वाळू चोरी विरोधी पथकांनी अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांची जप्ती करून मालकावर दंडात्मक कारवाई केली होती. या जप्त केलेल्या २९ वाहनांचा मंगळवारी (दि.२ मार्च ) कोपरगाव तहसील कार्यालयात लिलाव पार पडला. या लिलावात ६ वाहनांचाच लिलाव झाला असून त्यापोटी १२ लाख रुपयांची रक्कम वसूल झाली असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
या कारवाईतील वाहनांच्या लिलावातील वाहनामध्ये २ जेसीबी मशीन, ७ डंपर, २ ट्रक, १६ ट्रॅक्टर तर २ पिकअप टेम्पोचा समावेश होता. त्यापोटी ७४ लाख ५० हजारांची दंडाची रक्कम होती. मंगळवारी झालेल्या लिलावात ३ ट्रॅक्टर, १ पिकअप, १ ट्र्क व १ डंपर अशा ६ वाहनांचा लिलाव झाला असून त्यापोटी १२ लाख वसूल झाले आहेत. उर्वरित २३ वाहनांच्या लिलावात कोणीच सहभाग न घेतल्याने लवकरच पुन्हा लिलाव घेण्यात येईल, असेही तहसीलदार चंद्रे यांनी सांगितले.