अहमदनगर : पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करण्याची मंगळवारी अखेरची मुदत होती. त्यामुळे महापालिकेत मंगळवारी अर्जदारांची मोठी गर्दी झाली होती. या योजनेसाठी कोणी वंचित राहणार नाही,यासाठी नगरसेवकांच्या आग्रहावरून अर्ज स्वीकारण्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. दरम्यान घरकुलांसाठी आतापर्यंत तब्बल दहा हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.झोपडपट्टीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुले बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी महिनाभरापासून महापालिकेत अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज स्वीकारण्याची मंगळवारी शेवटची मुदत होती. त्यामुळे सायंकाळपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांची झुंबड उडाली होती. आतापर्यंत तब्बल दहा हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती प्रकल्प प्रमुख आर. जी. मेहेत्रे यांनी दिली. या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही,यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी, प्रस्ताव तयार करून शासनास पाठविणे, गुगल मॅपिंग आदी प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे वाढविण्यात आलेल्या मुदतीमध्येच नागरिकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.अशी आहे.. घरकुल योजनापंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत. ही घरे बांधण्यासाठी केंद्र शासन दीड लाख आणि राज्य शासन एक लाख रुपयांचे अनुदान देणार आहे. दुसरी योजना भागीदारी तत्त्वावरील आहे. तिसरी योजना तीन लाख रुपयांच्या आत ज्यांचे वार्षिक उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी आहे. यामध्ये बिल्डरकडून घरे बांधून घेतली जाणार आहेत. झोपडपट्टी पुनवर्सन हाच एकमेव शासनाचा हेतू आहे.
घरकुलांसाठी १० हजार अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 23:36 IST