अहमदनगर : विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील दुसरी ते चौथीचा अध्ययनस्तर निश्चित करण्यासाठी मराठी आणि गणित विषयाची चाचणी घेतली. या चाचणीत ३ लाख १८ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांना ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ श्रेणी मिळाली आहे. यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना ४५ दिवसांचे अतिरिक्त पूरक प्रशिक्षण देणार आहे. तसेच या सर्व शिक्षकांना खालच्या श्रेणीतून वरच्या श्रेणीत पाठविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील दर्जा वाढावा, या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी विभागीय आयुक्त डवले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल प्रयत्न करत आहेत. नवाल यांनी दीपस्तंभ महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. यात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्य ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. त्या आधारे त्यांचा अध्ययनस्तर निश्चित करण्यात आला आहे. यासाठी ८ आॅगस्टला जिल्ह्यात दुसरी ते चौथी या तीन वर्गातील विद्यार्थ्यांची कौशल्याची चाचणी घेण्यात आली. यात १० पैकी १० कौशल्याची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘अ’ श्रेणी, ९ कौशल्याची अचूक उत्तरे देण्याऱ्या ‘ब’ श्रेणी, ८ कौशल्याची अचूक उत्तरे देण्याऱ्या ‘क’ श्रेणी आणि ५ ते ७ कौशल्याची अचूक उत्तरे देण्याऱ्या ‘ड’ श्रेणी देण्यात आलेली आहे. ही चाचणी संबंधित शाळेतील संबंधित वर्गशिक्षकांने स्वत: घेतलेली आहे. (प्रतिनिधी)चाचणीत मूलभूत प्रश्नांबाबत विचारणाचाचणीत ‘ब’ वर्गापासून ‘ड’ वर्गात असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ४५ दिवसांचे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन देऊन त्यांना ‘अ’ श्रेणीत आणण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यासाठी दररोज एक तास अतिरिक्त अध्यापन करण्यास शिक्षकांना सांगण्यात आले आहे. अध्ययनस्तर निश्चितीच्या निकालानंतर पाच टप्प्यात पुन्हा या विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार असून त्या आधारे त्यांच्या कौशल्य ज्ञानाची पातळी तपासण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. या कौशल्य ज्ञान चाचणीत विद्यार्थ्यांना शाळेतील मूलभूत प्रश्न विचारण्यात आले. यात दुसरीतील विद्यार्थ्यांना मराठी विषयातून कविता गायन, मूळ अक्षरे वाचन आणि लिहिने, स्वर चिन्हेरहीत शब्द वाचन आणि लेखन, स्वरचिन्हे वाचन, सोपी वाक्य वाचन, सूचना ऐकून कृती करणे यांचा समावेश होता. दुसरीच्या गणित विषयात वार सांगणे, एक अंश वाचन व लेखन, पूर्ण दशक वाचन, ११ ते ४९ संख्या वाचन, ११ ते ४९ संख्या लेखन यांचा समावेश होता.चौथीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात कविता गायन, मूळ अक्षरे वाचन, स्वरचिन्हे युक्त वाचन आणि लेखन, जोड अक्षरे युक्त शब्द वाचन, अनुलेखन, वाक्यावरून अनुलेखन तर गणित विषयात दोन अंकी संख्याचे वाचन आणि लेखन, तीन अंकी संख्या वाचन, तीन अंकी संख्येची हातचा घेवून बेरीज आणि बिगर हाताचा घेवून बेरीज करणे यांचा समावेश होता.शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठी किमान कौशल्य ज्ञान चाचणी घेण्यात आलेली आहे. यात ३० टक्के विद्यार्थ्यांची प्रगती शंभर टक्के आहे. उर्वरित विद्यार्थ्याची ब, क आणि ड श्रेणी आहे. मात्र, या श्रेणीत या विद्यार्थ्यांनी ९ ते ५ प्रश्नांची उत्तरे अचूक दिलेले आहेत. त्यांना अतिरिक्त प्रशिक्षण दिल्यास त्यांचा गुणवत्ता स्तर उंचावेल.- दिलीप गोविंद, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.
१ लाख ९५ विद्यार्थी अप्रगत
By admin | Updated: August 19, 2014 23:31 IST