- प्रा. डॉ. यशवंत पाटील
प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या समृद्धीची ‘ओढ’ कमी-अधिक प्रमाणात असतेच. त्यासाठी धडपड व प्रयत्नही असतात. ते विशिष्ट मर्यादेपर्यंत आवश्यकही आहे. ही धडपड, पळापळ, जीवघेणे प्रयत्न मनाला स्वस्थ बसू देत नाहीत व चित्तही स्थिर ठेवत नाही. पण यामुळेच मानवी जीवन ‘चैतन्य’मय झाले आहे. हे खरेच. पण यास सद्सद् विवेक, सकारात्मक दृष्टिकोन, चिंतन आणि संयम लाभला तर जीवन हा एक आनंदी उत्सव बनेल. असे बरेच काही आचार्य विनोबा भावे यांच्या ‘गीताई’ प्रवचनातून विविध उदाहरणे आणि दृष्टांत देऊन जीवन ‘समृद्धी’विषयी सांगत.
व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार जीवन समृद्धीची समज, उमज आणि आकलन भिन्न-भिन्न असू शकते. त्यामुळे ‘समृद्धी’ची साचेबंद व्याख्या करणे कठीण आहे. ‘पणज्यातून मनाला चिरकालीन, टिकाऊ आनंद-समाधान-शांती मिळू शकते. मनाची प्रसन्नता अधिक उमलते-फुलते त्यास समृद्धी समजावे’ असे जे सॉक्रेटीसय म्हणतो ते अधिक संयुक्तीक आहे. उदा. एका विशिष्ट कार्याने स्वामी विवेकानंद समृद्ध होते. स्वत:च्या घरा-दारात आणि शेतात राबणारी खान्देशी कवयित्री बहिणाबाई समृद्ध समजली जाते.
खेड्या-पाड्यात वाडी-वस्तीवर काम करणारी अंगणवाडीतील गरीब शिक्षिका जेव्हा आनंदी, तृप्त दिसते तेव्हा ती ‘समृद्ध’ असते. अस्वस्थतेचा भोवरा मनात भिर-भिरणारा, बाह्यता समृद्ध दिसणारा आपल्या दृष्टीने ‘समृद्ध’ वाटतो. पण तसा तो अनेकदा नसतो.
स्वत:प्रती आणि इतरांसाठीही ‘प्रेम’ हा अडीच अक्षरी शब्द ज्या व्यक्तीच्या आचार-विचार, व्यवहारात ओत-प्रोत, ठासून भरलेला आहे तो समृद्ध, भौतिकदृष्ट्या त्याच्याजवळ काही असेल, नसेलही, प्रेमातून निर्माण झालेले अनुबंधच समृद्धी वाढवित असतात. ‘प्रेम’ हा अंतर्मनावर झालेला समृद्धीसाठीचा संस्कार आहे.