- प्रा. डॉ. यशवंत पाटील
झोपेतून उठलेल्या भगवान श्रीकृष्णाचे लक्ष त्याच्या पायाशी बसलेल्या अर्जुनाकडे प्रथम जाते. नंतर त्याच्या उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे जाते. तेव्हा दुर्योधन श्रीकृष्णाकडे सर्व सैन्याची मागणी करतो. ‘तथास्तु’ म्हणून श्रीकृष्ण त्यास होकार देतो. प्रचंड सैन्यप्राप्तीमुळे दुर्योधन खूप आनंदी होतो. सारे काही मिळाल्याने युद्धात विजयी झाल्याचा ‘उन्मादी’ आनंद युद्ध सुरू होण्यापूर्वीच त्याला होतो.
नंतर अर्जुन श्रीकृष्णास आर्जवी नम्र स्वरांत विनंती करतो. ‘भगवान !, या युद्धात तुम्ही माझे मार्गदर्शक म्हणून रहा.’ ‘तथास्तु’ म्हणून श्रीकृष्ण मान्यता देतात. तेव्हा दुर्योधन अर्जुनास म्हणतो, ‘अरे अर्जुना, तुझ्या वाट्याला फक्त कृष्णच ! पण माझ्या वाट्याला बघ केवढे प्रचंड सैन्य !’ असे म्हणून तो उपहासाने हसतो.
महाभारतातील ही गोष्ट सर्व परिचित आहे. महाभारतात दुर्योधनासह प्रचंड फौज कशी पराभूत झाली आणि अर्जुन कसा विजयी झाला हे सर्वज्ञात आहे. अर्जुनाच्या विजयामागे त्याचा ‘कर्मयोग’ तर आहेच. पण त्याच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाचे ‘मार्गदर्शन’ महत्त्वाचे आहे. त्या युद्धात श्रीकृष्ण योग्य दिशेने रथ नेत होता. अर्जुनाला सुयोग्य मार्गदर्शन करीत होता. त्याच्या मनात लढण्याची, योग्य-अयोग्य काय याची बिजे पेरीत होता. श्रीमद्भगवतगीतेत श्रीकृष्णाच्या मार्गदर्शक भूमिकेचे सर्व तत्त्वज्ञान व्यापक प्रमाणात आले आहे.
काल-मान-परिस्थिती कितीही बदलली तरीही ‘सत्यम्-शिवम्-सुंदरम्’सारखी मूल्ये चिरंतन असतात. उत्तम मार्गदर्शक व्यक्ती, कुटुंब, समाज, आजूबाजूचा भवताल सकारात्मक स्वरूपात बदलू शकतो, घडवू शकतो. विविध क्षेत्रात नावलौकिक, उत्तुंग यश मिळविणाऱ्या व्यक्तींनी ‘मार्गदर्शका’चे महत्त्व मान्य केले आहे. म्हणूनच मार्गदर्शकाची गरज आहे.