एखाद्या निसर्ग चमत्काराचा मोह होणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. जीवनाचे गीत गाणाऱ्या खळखळणाºया सलीलाचा, उंच-उंच डोंगरकड्यांवरून कोसळणाºया धबधब्याचा, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी मांडवाखाली पिसारा फुलविणाºया मयूराचा आनंदोत्सव पाहत राहणे हा माणसाच्या अंत:करणातील केवळ मोहच नाही, तर त्याच्या रसिक प्रवृत्तीचे शुभ लक्षण आहे. अशा काही स्वाभाविक मोहामुळे माणूस आतून निरोगी होतो व निकोप प्रवृत्तीने जगाकडे पाहू लागतो. जे आपले आहे, त्याला चिकटून बसणे आणि जे आपले नाही, ते ओरबाडण्यासाठी संपूर्ण समाज जीवनाला भयग्रस्त करणे, हेच खरे विकारी मनोवृत्तीचे लक्षण आहे. ही मोहग्रस्ताची जमात केवळ आजच वळवळ करत आहे असे नाही, तर अगदी महाभारताच्या कालखंडापासूनही धृतराष्ट्री प्रवृत्ती थैमान घालत आहे. या मोहरूपी सर्पाचे वर्र्णन करताना निर्मोही संत एकनाथ महाराज म्हणाले होते,लोभ सर्प डंखला करू काय?स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय।गुरू गारुडी आला धावुनीविवेक अंजन घातले नयनी वों ॥गुरू नावाचा गारुडी जोपर्यंत डोळ्यांत विचारांचे अंजन घालत नाही, तोपर्यंत डोक्यात सद्विचारांचे संवर्धन होत नाही आणि जोपर्यंत विचारांच्या खºया-खुºया परमार्थाचे जल समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झुळझुळत नाही, तोपर्यंत स्वार्थ आणि संपत्तीच्या बाजारात हजारो पामरे रडतच राहतात. हे काम समाजातील ज्या कर्णधाराकडे आहे, तेच आज दुर्दैवाने मोहफणीने ग्रस्त होऊन रम, रमा, रमीमध्ये रममाण होत आहेत. अंगावर एक लंगोटी, झोपायला धरतीचे आसन, पांघरायला आकाशाचे पांघरुण आणि खायला चार घरांतील भिक्षा एवढीच ज्याची संपत्ती असावी, असा साधू, संत आज आकाश पुष्पाप्रमाणे दुर्मीळ होत आहे.- प्रा. शिवाजीराव भुकेलें
लोभ सर्प डंखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 05:38 IST