१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 03:01 PM2024-05-13T15:01:46+5:302024-05-13T15:05:10+5:30

त्या युवकाचं वय केवळ १८ वर्ष होतं, तेव्हापासून त्याला दृष्टीदोष झाला. कुटुंबाने डॉक्टरांना दाखवलं तर त्याच्या डोळ्याला गंभीर आजार झाल्याचं सांगण्यात आले. उपचार करूनही फायदा झाला नाही. वयाच्या २१ व्या वर्षीपर्यंत युवकाच्या डोळ्याची दृष्टी पूर्णत: गेली.

त्यावेळी हा युवक दिल्लीच्या आयआयएमसी इथं पत्रकारितेचे शिक्षण घेत होता. डोळ्यांची दृष्टी गेली तरीही त्याने शिक्षण थांबवले नाही. काही वर्षांनी त्याने सर्वात कठीण समजली जाणारी युपीएससी परीक्षा दिली, या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा हा युवक देशात ७ व्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला होता.

या युवकाचं नाव आहे सम्यक जैन, जो सध्या आयएएस अधिकारी आहे. सम्यक दिल्लीत राहणारा आहे. त्याचे सर्व शिक्षण दिल्लीत झालंय. आई आणि वडील दोघेही एअर इंडियात कामाला आहेत. परंतु पोस्टिंगमुळे वडील पॅरीसमध्ये राहतात.

लहान वयातच सम्यकची दृष्टी गेल्याने कुटुंबाला फार मोठा धक्का बसला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निराशा होती. परंतु सम्यकने हार मानली नाही. युपीएएसीसारखी मोठी परीक्षा उत्तीर्ण करू याचा विचार सम्यकनेही केला नव्हता.

शालेय शिक्षणानंतर सम्यकने बीए ऑनर्स केले. त्यानंतर जर्नलिज्मचं शिक्षण घेण्यासाठी त्याने दिल्लीच्या आयआयएमसीमध्ये प्रवेश घेतला. मात्र त्याच काळात त्यांच्या आयुष्यात मोठी दुर्घटना घडली जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटला.

दृष्टी गेली तरी सम्यक जिद्द हरला नाही. त्याने ऑडिओ फॉर्मेटमधून अभ्यास पूर्ण करत त्याने पुढील शिक्षण पूर्ण केले. जर्नलिज्ममध्ये पदवी घेतल्यानंतर तो आंतरराष्ट्रीय संबंधामधील मास्टर डिग्री पूर्ण करण्यासाठी JNU मध्ये प्रवेश घेतला.

या काळात जगासह देशात कोरोना महामारी आली. देशात सगळीकडे लॉकडाऊन लागले. शाळा कॉलेज बंद झाले. याच वेळेत सम्यकने घरात युपीएससी परीक्षेची तयारी केली. पर्यायी विषयासाठी त्याने राजनीती विज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध हे निवडले.

पहिल्या प्रयत्नात सम्यकला यश मिळालं नाही. परंतु पुन्हा तो जिद्दीने उभा राहिला. मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी आणखी जोमाने त्याने प्रयत्न सुरू केले. त्यानंतर २०२१ मध्ये सम्यक जैनने पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. परीक्षेतील पेपर लिहिण्यासाठी त्याच्या आईने मदत केली. परीक्षा उत्तीर्ण झाली, मुलाखत पार पडली. निकाल लागला तेव्हा तो देशात ७ व्या क्रमाकांवर आला होता.

सम्यकनं त्याचे यशाचे श्रेय आईला दिलं आहे जिनं प्रत्येक वळणावर त्याची साथ दिली. सम्यक त्याच्या तयारीवेळी दिवसातून कमीत कमी ७ तास अभ्यास करत होता. मॉक टेस्ट आणि वृत्तपत्राला तो महत्त्व द्यायचा. यूपीएससीसाठी प्रत्येक छोटी माहिती जमा करायचा.