राजगाव येथील उपबाजार अनियमित
By Admin | Updated: June 16, 2014 00:45 IST2014-06-16T00:20:43+5:302014-06-16T00:45:02+5:30
उपबाजार कधी सुरू तर बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात असतात.

राजगाव येथील उपबाजार अनियमित
नराजगाव : शेतकर्यांची गैरसोय दूर करण्याचा डांगोरा पिटत वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राजगाव येथे उपबाजाराची सुविधा सहा वर्षांपुर्वी उपलब्ध केली आहे. मात्र, हा उपबाजार कधी सुरू तर बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात असतात. राजगाव परिसरातील शेतकर्यांना आपला शेतमाल विक्रिला आणण्यासाठी वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धाव घ्यावी लागत असे. मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावरील तथा राजगाव परिसरातील शेतकर्यांची शेतमालाची विक्री करताना गैरसोय होऊ नये म्हणून वाशिम बाजार समितीने ४ एप्रिल २00७ रोजी राजगाव येथे उपबाजाराचा स्थापना केली. त्यानंतर हा उपबाजार काही महिने नियमित सुरू होता. सात-आठ महिन्याने उपबाजार ह्यकधी सुरू तर कधी बंदह्ण या फेर्यात अडकला. या फेर्यातून अजूनही उपबाजाराची सुटका होऊ शकली नाही. त्यामुळे मराठवाडा व राजगाव परिसरातील शेतकर्यांना वाशिमला शेतमाल आणावा लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैशाच्या अपव्यय होत आहे. उपबाजार नियमितपणे सुरू राहत नसल्याने तसेच याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने गैरसोय होत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. तर या उपबाजारात शेतकरीबांधवच जास्त प्रमाणात शेतमाल आणत नसल्याचा युक्तीवाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकार्यांनी केला आहे. शेतकर्यांनी नियमितपणे पुरेसा प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला तर उपबाजार नियमितपणे सुरू राहु शकतो. शेतमाल पुरेशा प्रमाणात येत नसल्याने उपबाजार नाईलाजाने अनियमित राहतो, असेही एका पदाधिकार्याने सांगितले.