लाच म्हणून शरीर सुखाची मागणी करण्याच्या प्रकरणाचे केडीएमसीच्या स्थायी समितीत तीव्र पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 16:52 IST2019-03-02T16:51:38+5:302019-03-02T16:52:23+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेत महिलेकडे लाचेच्या स्वरुपात शरीर सुखाची मागणी केल्याच्या प्रकरणाचे स्थायी समितीत तीव्र पडसाद उमटले.

लाच म्हणून शरीर सुखाची मागणी करण्याच्या प्रकरणाचे केडीएमसीच्या स्थायी समितीत तीव्र पडसाद
कल्याण - पैशाच्या स्वरुपात लाच मागण्याची प्रकरणे अनेक घडली असली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेत महिलेकडे लाचेच्या स्वरुपात शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी महापालिकेच्या कर विभागातील लिपिक रमेशचंद्र लक्ष्मण राजपूत याला ठाणे लाच लुचपच प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या घटनेपश्चात ‘आम्हाला देखील असुरक्षित वाटत असल्या’ची भावना स्थायी समिती सदस्या कस्तूरी देसाई यांनी व्यक्त केली आहे.
आज शनिवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेना सदस्य वामन म्हात्रे यांनी महापालिकेची प्रतिमा यापूर्वी भ्रष्ट होती. अनेक अधिका:यांनी लाच घेतल्याचे उघड झाले आहे. भ्रष्टाचाराचा वेगळाच प्रकार महापालित रजपूत यांच्या प्रकरणानंतर उघड झाला आहे. त्यामुळे महापालिकेची प्रचंड बदनामी झाली आहे. अशा प्रकारची केस महाराष्ट्रात प्रथमच घडली आहे. ही काही महापालिकेची चांगली बाब नाही. प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. रजपूतच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली. सदस्य वामन म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या गंभीर विषयावर मनसे सदस्य देसाई यांनी रजपूत यांनी जो प्रकार केला आहे. त्यामुळे आम्हा महिला नगरसेविकांनाही असुरक्षित वाटत आहे. नागरीकांच्या समस्या व विविध विकास कामांसाठी विविध खात्याच्या अधिकारी वर्गाकडे जात असतो. या प्रकरणानंतर आम्ही अधिका-यांकडे कामानिमित्त जायचे की नाही असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.
आम्हाला काही एक सुरक्षितता नसते. त्यामुळे अशा प्रकारची हिंम्मत यापूढे कुठलाही अधिकारी करणार नाही. यासाठी रजपूत प्रकरणात कठोर कारवाई केली जाणो अपेक्षित आहे अशी मागणी केली. देसाई यांच्या मुद्याला धरुनच शिवसेना सदस्या शालिनी वायले यांनी आम्हाला काही एक सुरक्षितता नाही. त्यामुळे आम्हाला महिला सुरक्षा रक्षक पुरविला जावा. एखाद्या महिलेशी असे वर्तन करण्याची एका लिपिकाची कशी काय हिंम्मत होते. यावरुन वरिष्ठांचा त्यावर काही एक वचक नाही. यामुळे महापालिकेची बदनामी झालेली आहे. लाच प्रकरणात केवळ निलंबन केले जाते. केवळ निलंबित करण्याची कारवाई न होता त्यापेक्षा जास्त कठोर कारवाई केली जावी.
शिवसेना सदस्या प्रियंका भोईर यांनी हा प्रकारच मुळात निंदनीय आहे. रजपूतला निलंबीत न करता. त्याला सेवेतून कायम स्वरुपी बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली आहे. महिलांचा हा राग आणि संताप पाहून सदस्य वामन म्हात्रे यांनी आत्ताच कारवाईचे आदेश द्या अशी आग्रही मागणी केली. सदस्यांच्या भावना तीव्र आणि संतापजनक आहे. त्यांच्या भावनांशी समिती सहमत असल्याचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले. रजपूत याला या प्रकरणात केवळ निलंबित न करता त्याला महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे आदेश उपायुक्त मिलिंद धाट यांना दिले आहे. उपायुक्त धाट यांनी रजपूत याच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समितीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर ठेवून पुढील कार्यवाही केली जाईल. त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.