ठाण्यात सुरु असलेले प्रकल्प जूनअखेर पूर्ण करण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 14:58 IST2017-12-01T14:55:31+5:302017-12-01T14:58:57+5:30
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले.

शहरातील महत्वाच्या कामाचा आढावा घेताना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल. सोबत अतिरिक्त आयुक्त(१) सुनील चव्हाण.
ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेले विविध महत्वाचे प्रकल्प जून अखेर पूर्ण होतील अशा पद्धतीने त्यांचे नियोजन करावे असे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी सर्व अधिकाºयांना दिले. दरम्यान प्रत्येक प्रकल्पांच्या मंजुरीसाठी आणि मंजुरीनंतर जो विलंब होतो तो विलंब कसा कमी करता येईल त्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, मुख्य लेखा परीक्षक आणि नगर अभियंता यांची विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतला.
सुट्टीच्या दिवशी आयुक्तांनी सर्व अधिकाºयांची बैठक घेवून शहरात सुरू असलेल्या सर्व महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेवून ते सर्व प्रकल्प जून २०१८ पर्यंत पूर्ण होतील यासाठी प्रत्येक अधिकाºयांनी नियोजन करावे अशा सूचना दिल्या. तथापी २०१६-२०१७ आणि २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर केल्यानंतरच २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात कोणत्या कामांचा समावेश करण्यात येईल याचा निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
बांधकाम विकास अधिकार हस्तातंरणातंर्गत गेल्या ६ महिन्यात जी कामे मंजूर झाली आहेत, त्याचा अद्ययावत अहवाल सादर करण्याच्या सूचना देतानाच त्यातील कोणत्या प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे किंवा सुरू झालेले नाही त्याचा अहवाल शहर विभागाने सादर करण्याच्या सूचना ही शेवटी त्यांनी दिल्या.