दिल्लीचं पथक आज खंबाटकी घाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:39 IST2018-04-13T00:39:46+5:302018-04-13T00:39:46+5:30

दिल्लीचं पथक आज खंबाटकी घाटात
सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या अपघातस्थळाची शुक्रवारी (दि. १३) संयुक्तरीत्या पाहणी करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाचे विशेष पथक दिल्लीवरून साताऱ्यात दाखल होणार आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व महसूल विभाग यांची आपल्या दालनात बैठक घेतली. यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात असणाºया ‘एस’ आकाराच्या वळणावर दोन दिवसांपूर्वी भीषण अपघातात १८ जण ठार झाले होते. या अपघातानंतर या अपघातस्थळी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याविषयी या बैठकीत ऊहापोह करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तांत्रिक विभागाची टीम दिल्लीवरून साताºयात दाखल होणार आहे. या टीमसोबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. ‘एस’ वळण काढून टाकण्यासारखी मागणी होत आहे.
स्थानिक आमदार मकरंद पाटील यांच्यासोबतच इतर लोकप्रतिनिधींनी याची सूचना केली आहे. या सूचनाही गांभीर्याने घेऊन कार्यवाही करण्यात येणार आहे. अपघात नेमक्या कोणत्या कारणाने होत आहेत, याचाही तांत्रिक दृष्टीने अभ्यास केला जाणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.