भक्ष्याचा पाठलाग : भूक भागविण्यासाठी धावणारा बिबट्या नाशिकमध्ये पडला विहिरीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:19 IST2018-02-17T14:04:13+5:302018-02-17T14:19:56+5:30
क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचाºयांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले.

भक्ष्याचा पाठलाग : भूक भागविण्यासाठी धावणारा बिबट्या नाशिकमध्ये पडला विहिरीत !
नाशिक : जिल्ह्यातील बागायती तालुका म्हणून ओळख असलेल्या निफाडमधील गोदाकाठाच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. गोदाकाठालगत ऊसशेती, गहू, मकाची शेती असल्यामुळे या भागात बिबट्यांचा अधिवास वाढला आहे. शनिवारी पहाटेपाच वाजेच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करताना नर बिबट्या शेतातील उघड्या विहिरीत कोसळला.
निफाड तालुक्यातील तारुखेडले गावाच्या शिवारातील संतोष रामचंद्र शिंदे यांच्या गट क्रमांक १६मधील शेतीमध्ये विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांना पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता आढळून आले. पीकांना पाणी देण्यासाठी शिंदे हे नेहमीप्रमाणे विहीरीजवळ पोहचले असता बिबट्याची डरकाळी त्यांच्या कानावर पडली. त्यांनी विजेरीच्या सहाय्याने विहिरीत बघितले असता बिबट्याचे डोळे चमकले. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी तांबड फुटण्याची प्रतीक्षा करत सर्व आवश्यक साहित्याची जमवाजमव करत वाहन सज्ज केले. पहाट उजाडताच वाहनासह वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी. वनरक्षक व्ही.आर.टेकनर, विसापूर सोनवणे, वनसेवक व्ही.एस.लोंढे, भय्या शेख, दत्तू आहेर, मधुकर शिंदे आदिंनी घटनास्थळ गाठले. क्रेनच्या साहाय्याने पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. यावेळी विहिरीच्या पाण्यातून धडपणारा बिबट्या अलगद पिंज-यात येऊन बसला आणि झडप पडल्याने पिंजरा बंदिस्त झाला. क्रेनच्या सहाय्याने पिंजरा वर काढण्यात आला. वनकर्मचा-यांनी सुखरुपपणे बिबट्याला रेस्क्यू करत जीवदान दिले. तत्काळ बिबट्याला निफाड रोपवाटिकेत हलविण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिकारी डॉ. चांदोरे यांनी बिबट्याच्या प्रकृतीची तपासणी केली. हा रेस्क्यू केलेला बिबट्या पाच ते सहा वर्षांचा पुर्ण वाढ झालेला असून नर जातीचा आहे.
जनजागृती करणार; लवकरच निफाड परिसराचा पाहणीदौरा
लवकरच निफाड परिसरातील गोदाकाठ भागाचा पाहणीदौरा करणार आहे. येथील शेतक-यांसोबत संवाद साधून त्यांना विहिरी सुरक्षित करण्याबाबत जनजागृती करणार आहे. या भागात शेती व ऊस, मका, गहू यासारख्या पीकांचे बारामाही उत्पादनामुळे बिबट्यांचा वावर आहे. त्यांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होत आहे. नागरिकांनी स्वत:सह पशुधनाची खबरदारी घ्यावी. शक्यतो बिबट्याच्या हालचाली संध्याकाळपासून गतीमान होतात. त्यामुळे नागरिकांनी संध्याकाळनंतर शेतीच्या परिसरात जाणे टाळावे. या भागात जनजागृतीसाठी ‘जाणता वाघोबा’ नावाचे अभियान सुरूच आहे. यामाध्यमातून बिबट्याचे जीवशास्त्र नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न वन्यजीवांवर अभ्यास करणाºया सामाजिक संस्थेकडून होत आहे.
- डॉ. शिवबाला एस., उपवनसंरक्षक नाशिक पुर्व