पुण्यातून ४ तरुणींचे अपहरण? एकीने केली स्वत:ची शिताफीने सुटका
By Admin | Updated: January 27, 2017 21:25 IST2017-01-27T21:25:21+5:302017-01-27T21:25:21+5:30
पुण्यातील चार तरुणींचे अपहरण झाले असून त्यापैकी एफवायबीएस्सीत शिकत असलेल्या तरूणीने नाशिकमध्ये स्वत:ची सुटका करवून घेतली आहे़

पुण्यातून ४ तरुणींचे अपहरण? एकीने केली स्वत:ची शिताफीने सुटका
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 : पुण्यातील चार तरुणींचे अपहरण झाले असून त्यापैकी एफवायबीएस्सीत शिकत असलेल्या तरूणीने नाशिकमध्ये स्वत:ची सुटका करवून घेतली आहे़ यानंतर शुक्रवारी(दि़२७) सायकांळी साडेसहा वाजेच्या सुमारास या तरुणीने पोलीस ठाणे गाठून आपल्यावर ओढवलेल्या प्रसंग सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़
पिडीत मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती पुण्यातील कोथरूड येथील एका महाविद्यालयात एफवायबीएस्सीत शिक्षण घेते आहे़ तीन दिवसांपुर्वी महाविद्यालयात जात असतांना एका लाल रंगाच्या कारमधून आलेले तीन पुरुष व एका महिलेने तिचे अपहरण केले. यावेळी गाडीत तिच्यासह अन्य तीन अपहृत मुलीदेखील होत्या. यापैकी एक मुलगी अवघी १३ वर्षांची आहे़
शुक्रवारी (दि़२७) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नारायण किसन पाटील हे रिक्षाचालक सीबीएस परिसरात प्रवाशांची वाट पाहत थांबले होेते़ त्यावेळी पिडीत युवती अचानक रिक्षात येऊन बसली व आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत त्वरीत पोलीस ठाण्यात नेण्याची विनंती केली़ त्यानुसार रिक्षाचालक पाटील यांनी तिला पोलीस ठाण्यात सोडले़
पिडीत मुलीने पोलिसांना सांगितले की, पुण्यातून तीन पुरुष व एका महिलेने आणखी तीन मुलींचे अपहरण केले असून गत तीन दिवसांपासून उपाशी ठेऊन छळ केला जात आहे. या तरुणीच्या अंगावर ब्लेडने वार केल्याचेही वृत्त आहे़ दरम्यान, अपहरणकर्त्यांचा अद्याप तपास लागलेला नसून पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून शोध सुरू केला आहे़.