परवानगी २०० फुट अन् खोदकाम ४०० फुटाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:08 IST2017-12-27T22:08:01+5:302017-12-27T22:08:30+5:30
जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे.

परवानगी २०० फुट अन् खोदकाम ४०० फुटाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत १५१० अनाधिकृत बोअरवेलचे खोदकाम केल्याची धक्कदायक बाब उघडकीस आली आहे.
जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा वाढल्याने त्यात प्लोराईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांना दुर्धर आजाराची लागण होत आहे. जमिनीतून निर्धारित मर्यादेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा उपसा केला जात असल्याने भविष्यातील पाणी साठ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
अनाधिकृत बोअरवेल खोदकामाला प्रतिबंध लागावा, भूगर्भातील सुरक्षीत समजला जाणारा पाणीसाठा कायम रहावा, शासनाने भूजल सर्वेक्षण अधिनियमाची अंमलबजावणी केली. यातर्गंत २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदण्यास आणि दोन बोअरवेलमधील अंतर पाचशे मीटरपेक्षा अधिक ठेवण्याचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यावर सोपविली. मात्र या सर्वांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे राष्टÑीय हरित लवादाने याची गांर्भियाने दखल घेत दुर्लक्ष करणाऱ्या जबबादार अधिकाºयांवरच कारवाई करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात मागील सहा महिन्यात तीन ते चार हजारावर बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले. यापैकी १५१० बोअरवेल या ४०० फुटापेक्षा अधिक खोल खोदण्यात आल्या असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचे चित्र आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात सर्रासपणे २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदल्या जात आहे. मात्र प्रशासनाने आत्तापर्यंत एकावरही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.
६८ पाण्याचे स्त्रोत दूषित
भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे १५३२ स्त्रोत आहेत. यापैकी ६८ पाण्याचे स्त्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचे परीक्षणानंतर पुढे आले. त्यामुळे या स्त्रोतांचे पाणी पिण्यास गावकऱ्यांना मनाई केली आहे.
दर महिन्याला भूजल पातळीची नोंद
जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळी दोन मीटरने खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर भूजल सर्वेक्षण विभागाकडून दर महिन्याला भूजल पातळी मोजली जात आहे. दर महिन्याला भूजल पातळीची नोंद घेणार गोंदिया महाराष्टÑातील एकमेव जिल्हा आहे.