बिटरगाव : शेकडो वर्षांपासून पैनगंगा नदी तीरावर असलेल्या गावांचा नैसर्गिक अधिकार इसापूर धरण निर्मितीनंतर संपुष्टात आला. आता पैनगंगा तीरावरील गावांमध्ये ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी काठच्या लोकांना पावसाळ्यात कृत्रिम पूर तर हिवाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे.इसापूर धरणाची निर्मिती १९६७ साली झाली. तेव्हापासून धरणातील पावसाळ्यात जास्तीचे झालेले पाणी नदीपात्रात सोडल्याने महापुराची परिस्थिती निर्माण होते. या पूर परिस्थितीचा फटका नदी किनाऱ्यावरील गावांना व शेतजमिनींना मोठ्या प्रमाणात बसतो. या नदी तीरावरील गावांमध्ये आॅक्टोबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाई निर्माण होते. नागरिकांना व गुराढोरांना देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यावर्षीचे चित्र तर अधिकच भयावह आहे. नदी किनाऱ्यावरील ४५ गावांची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतींनी पैनगंगा नदीवरून केली आहे. परंतु पाण्याअभावी ही योजना आॅक्टोबर महिन्यापासूनच बिनकामाची ठरत आहे. गावातील महिलांना आपली रोजमजुरी बुडवून दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. शिवाय शाळकरी मुलेसुद्धा शाळेत न जाता सायकलवरून दिवसभर पाणी आणतात. शेतकरी व शेतमजुरांनाही हेच काम दिवसभर करावे लागते. कुणी बैलबंडीने, कोणी सायकलने तर कोणी डोक्यावर पाणी आणताना दिसतात. या परिसरातील संपूर्ण ४५ गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. या भागातील नागरिकांनी इसापूर धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्यासंबंधी ग्रामपंचायतीच्या ठरावासह निवेदनेसुद्धा सर्व संबंधितांना दिली आहे. सोबतच परिसरातील आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींना देखील निवेदने देऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. परंतु त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. इसापूर धरणामुळे पावसाळ्यात प्रचंड नुकसान नागरिकांना सहन करावे लागते. नुकसानग्रस्त नागरिकांचा धरणातील पाण्यावर पहिला अधिकार आहे. परंतु त्याची दखल कुणी घेत नाही. पाणीटंचाईमुळे दरवर्षी होरपळणाऱ्या हजारो नागरिकांचा वालीच कुणी उरला नाही. त्यामुळे इसापूर धरण या परिसरातील ४५ गावातील नागरिकांसाठी अभिशाप तर ठरत नाही ना, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
पैनगंगेच्या तीरावर पाणीटंचाई
By admin | Updated: November 22, 2014 02:01 IST