पैनगंगा कोरडी : ढाणकी, बिटरगावची नळयोजना बंदअविनाश खंदारे उमरखेड उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून, त्यातच पैनगंगा कोरडी पडल्याने उमरखेड तालुक्यातील ४५ गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बिटरगाव, ढाणकी येथील नळयोजना बंद पडली असून, पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे पाणीटंचाईकडे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात भूगर्भातील जलस्त्रोत खालावले आहे. बोअरवेल आणि विहिरींनीही तळ गाठला आहे. उमरखेड तालुक्याची जीवनवाहिनी असलेली पैनगंगा नदी हिवाळ्यातच आटली आहे. नदी पात्रात ठणठणाट असल्याने तीरावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तिवरंग, भांबरखेडा, झाडगाव, हातला, दिवटपिंप्री, पळशी, बारा, मेलखेड, संगमचिंचोली, मार्लेगाव, बिटरगाव, लिंबगव्हाण, तिवडी, राजापूर, टाकळी, विडूळ, लोहरा, साखरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, मानकेश्वर, कोप्रा, सोईट, सिंगदी, ब्राह्मणगांव, गांजेगाव, सावळेश्वर, खिरटगाव, भोजनगर, पिंपळगाव, जेवली, मुरली, सोनदाबी, एकंबा, परोटी, जवराळ, थेरडी, गाडी, बोरी आदी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावातील नागरिक रात्रंदिवस पाण्याच्या शोधात फिरत आहेत. अनेक गावातील नळयोजनाही कोरड्या पडल्या आहे. जनावरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. इसापूर धरणात पाणीसाठा आहे. परंतु उमरखेड तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या उदासिन धोरणामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे. नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेतले. तहसील, पंचायत समितीला निवेदन दिले. परंतु कोणत्याही हालचाली दिसत नाही. नागरिकांना पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. नदीपात्रात पाणी सोडले नाही तर नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. बिटरगावात पाण्यासाठी झुंबडबिटरगाव या १० हजार लोकसंख्येच्या गावातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आटल्या आहेत. एकाच विहिरीवरून पाणी भरावे लागते. त्यामुळे याठिकाणी मोठी झुंबड असते. मन्याळी गावातील एका विहिरीवरून नळयोजना होती, परंतु ही विहिरी आटल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे. दुसरी नळयोजना पैनगंगा नदीवरून आहे. मात्र नदी पात्रात पाणी नसल्याने या योजनेला घरघर लागली आहे.
४५ गावांत पाणीटंचाई
By admin | Updated: May 20, 2015 00:09 IST