लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठ्याच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे संपूर्ण उन्हाळाभर नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहे. ठरलेल्या दिवशी नळाला पाणी आले, असे अपवादानेही घडले नाही. एवढेच नव्हे तर काही भागात आठ ते दहा दिवसाआड नळ येत आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता आले नाही. खंडित वीज पुरवठा, लिकेज पाईपलाईन आदी कारणे त्यावेळी सांगितली गेली. उन्हाळ्यात तरी लोकांना पाण्यासाठी भटकावे लागणार नाही, अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.शहराच्या अनेक भागात असलेल्या खासगी स्रोतांनी तळ गाठला आहे. विहिरी, हातपंपांना पाणी नाही. अशावेळी प्राधिकरणाचे पाणी हा एकमेव प्रमुख स्रोत ठरतो. परंतु या विभागानेही लोकांचा हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. शहरात अनेक ठिकाणी लिकेजचा प्रश्न निर्माण झाला आहे. विकास कामांच्या नावाखाली हे सर्व ढकलले जात आहे. एकदा काढण्यात आलेला बिघाड वारंवार निघतो. अर्थातच झालेले काम निकृष्ट राहिले हे स्पष्ट होते. काही ठिकाणी पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होताना दिसत आहे.अनेक लोकांकडे पाण्याची साठवणूक करण्यासाठी आवश्यक तेवढी साधने नाही. जास्तीत जास्त चार किंवा पाच दिवस पुरेल एवढेच पाणी ते साठवून ठेवू शकतात. अशावेळी निर्धारित काळात नळ येईल अशी अपेक्षा त्यांना असते. परंतु सात-आठ काही भागात तर नऊ-दहा दिवस लोटूनही पाणी येत नाही. त्रस्त झालेल्या नागरिकांनी प्राधिकरणाकडे वारंवार तक्रारी करूनही उपयोग होत नाही. नेमकी काय अडचण आहे हेसुद्धा स्पष्टपणे सांगितले जात नाही. थातुरमातूर कारण सांगून नागरिकांना परत पाठविले जाते. बहुतांश वेळा तर या विभागाचे जबाबदार अधिकारी उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे.कमी दाबाने पाणीपुरवठायवतमाळ शहरातील काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नळ जाईपर्यंत दोन ते तीन हजार लिटर पाण्याचीही साठवणूक होत नाही. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कधीतरी एखादा कर्मचारी पाहून जातो. पुढे मात्र काहीही उपाययोजना होत नाही. अनेक भागात अमृत योजनेंतर्गत नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यावर जुने कनेक्शन जोडण्याची गती गेली अनेक महिन्यांपासून अतिशय संथ आहे.
यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता आले नाही.
यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला
ठळक मुद्देवेळापत्रकाचे भानच नाही : संपूर्ण उन्हाळाभर चटके