महागाव : तालुक्यातील शिक्षणाची स्थिती अतिशय वाईट असून प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ केवळ खेळण्यात येतो. तालुक्यात तब्बल १७० शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महागाव तालुक्यात शिक्षकांअभावी अनेक गावातील शाळांना कुलूप ठोकण्याची पाळी आली आहे. काही शाळांना गावकऱ्यांनी कुलूप ठोकल्याच्या घटनाही घडल्या आहे. तरीदेखील जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा भरायला तयार नसल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामीण जनतेच्या शिक्षणासारख्या आवश्यक प्रश्नाविषयी कोणतेही घेणे-देणे नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब व आदिवासींच्या मुलांचा शैक्षणिक पाया कच्चा राहात आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या २७ हजारांच्या घरात असून त्या तुलनेत त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या नगन्य असल्याचे दिसून येते. शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांना केवळ शाळेत टाईमपास करावा लागतो. उपस्थित शिक्षकही विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुटी देऊन टाकतो. कसेतरी दिवस ढकलण्याची कसरत शिक्षण विभागाची दिसून येत आहे. शिक्षक मिळावा म्हणून कासारबेहळ व वनोली येथील गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले होते. परंतु त्यांना आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नाही. ही स्थिती एक-दोन गावातील नाही तर तालुक्यातील विविध गावातील आहे. तब्बल ११७ शिक्षकांची पदे रिक्त आहे. शिक्षकांच्या अनुशेषाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होत असून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी मात्र तालुक्यातील शिक्षकांचा अनुशेष दूर करण्यास असमर्थ ठरलेले दिसून येत आहे. शिक्षकच नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळांमधून काढून खासगी शाळेत टाकले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या झपाट्याने घसरत आहे. खासगी शाळेच्या वर्गण्या, संस्थेची मनमानी असली तरी जिल्हा परिषदेच्या कोलमडलेल्या शिक्षण विभागाच्या कारभारामुळे पोटाला पिळ देवून मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांना खासगी शाळेत टाकण्याशिवाय आता पर्याय नसल्याचे एका पालकाने ‘लोकमत’ला सांगितले. (शहर प्रतिनिधी)
शिक्षकांची १७० पदे रिक्त
By admin | Updated: December 1, 2014 23:01 IST