नेर : तालुक्यातील चिकणी (डोमगा) येथील नागरिकांना गेली १२ वर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दरवर्षी निर्माण होणारी ही समस्या निकाली काढण्यासाठी निवेदने, घागर मोर्चा आदी प्रकारचे आंदोलन करण्यात आले. मात्र ही समस्या सोडविली गेली नाही. परिणामी याहीवर्षी नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधी मात्र उदासीन आहेत.नेर-कारंजा मार्गावर असलेल्या या गावाची लोकसंख्या अडीच हजार आहे. या गावाला दूरवर असलेल्या एका विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र या योजनेच्या पाईपलाईनचे काम निकृष्ट झाल्याने गावकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही. अखेर ही योजना बंद पडली. प्रशासनाने या गावात कुपनलिका खोदली. मात्र हे स्रोतही उन्हाळ्यात कोरडे पडतात. गावातील दोन विहिरींमध्येही ठणठणाट असतो. या स्रोतांना पाणी राहात नसल्याने गावकऱ्यांना गावापासून तीन किलोमीटर दूर अंतरावरून पाणी आणावे लागते. मजूर वर्गाला कामधंदा सोडून पाण्यासाठी भटकावे लागते. कालांतराने ही समस्या एवढी तीव्र होते की आंघोळही तीन दिवसांच्या अंतराने करावी लागते. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. मात्र परिसराशी संबंधित लोकप्रतिनिधी गावामध्ये योजना खेचून आणण्यात फारसे गंभीर दिसत नाही. परिणामी जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. यातीलच एक गंभीर समस्या पाण्याची आहे. (तालुका प्रतिनिधी)
१२ वर्षांपासून पाण्यासाठी टाहो
By admin | Updated: February 16, 2015 01:52 IST