विनयभंगाचा गुन्हा : पालकांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा यवतमाळ : चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी वर्ग शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना येथील सत्चिकित्सा प्रसारक मंडळाद्वारे संचालित श्री साई विद्या निकेतनमध्ये मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी सदर शिक्षकाला विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्या गावातून रात्रीच अटक करण्यात आली आहे. दरम्यान संतप्त पालकांनी या प्रकरणात दोषी शिक्षकाला सहकार्य करणाऱ्या मुख्याध्यापक व संचालक मंडळावरही गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गजानन बकाराम भलावी (२८) रा. सत्तरपूर ता. आष्टी जि. वर्धा ह.मु. वाघापूर रोड यवतमाळ असे या शिक्षकाचे नाव आहे. तो सेमी इंग्रजी माध्यमाच्या चौथ्या वर्गाला शिकवितो. विद्यार्थिनीच्या पालकांनी नोंदविलेल्या फिर्यादीवरून यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम १०, भादंवि कलम ३५४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाळेतील एका विद्यार्थिनीने या प्रकरणाचा भंडाफोड केला. तिने या अश्लील वर्तनाबाबत आपल्या आईला सांगितले. नंतर ही बाब शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला सांगण्यात आली. त्यांनी आपल्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता हा घृणास्पद प्रकार पुढे आला. १२ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता वर्गात त्या शिक्षकाने विनयभंगाचा हा प्रकार केल्याचे विद्यार्थिनीने सांगताच पालकांनी सोमवारी रात्रीच पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. मंगळवारी सकाळी या प्रकरणाची चर्चा होताच पालकांचा जमाव साई विद्या निकेतनपुढे जमला. त्यांनी मुख्याध्यापक मिनल भीष्म यांना जाब विचारला. शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय उपाय केले आहेत, अशी विचारणा केली गेली. (कार्यालय प्रतिनिधी) ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ पालकांचा मोर्चा यवतमाळ : पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. सदर संस्थेच्या संचालक मंडळ व मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिक्षक बडतर्फ दरम्यान वर्ग शिक्षक भलावी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच त्याला संस्थेने बडतर्फ केले. पालक समितीची आॅक्टोबरमध्ये बैठक झाली होती. आता जानेवारीत लगेच ही बैठक बोलविली जाईल, असे स्पष्ट करताना मुख्याध्यापक मिनल भीष्म यांनी सुरक्षेच्या दृष्टीने शाळा परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले नसल्याची कबुली ‘लोकमत’कडे दिली. या गुन्ह्याचा तपास एसडीपीओ पीयूष जगताप करत आहे. (कार्यालय प्रतिनिधी) आज पालकांचे धरणे विद्यार्थिनीच्या छेडखानी प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी बुधवारी पालकांकडून धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच विद्यार्थिनीच्या छेडखानी प्रकरणात सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर पोलिसांच्या जिल्हा सायबर शाखेकडून वॉच ठेवण्यात येणार आहे. याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. पोलिसांनी मागितला सचिवाकडे अहवाल शाळेतील गैरप्रकाराबाबत सत्चिकित्सा प्रसारक मंडळाच्या सचिवाकडे पोलिसांनी अहवाल मागितला आहे. शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार एन.एम. पंत यांनी वर्गशिक्षकाच्या गैरवर्तनाबाबत पालकांच्या तक्रारीवर शाळा व्यवस्थापनाने काय कारवाई केली, याबाबतचा अहवाल व त्याच्या छायांकित प्रती मागितल्या आहे.
शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन
By admin | Updated: January 18, 2017 00:06 IST