नेर : राज्य परिवहन महामंडळाने कर्तव्यावर असताना एसटी चालक व वाहकांनी मोबाईलचा वापर करू नये तसेच शिक्षकांनी तासिका सुरू असताना वर्गात मोबाईल वापरू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. परंतु प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवून एसटी चालक-वाहक व शिक्षकांकडून मोबाईलचा वापर कर्तव्यावर असताना सर्रास दिसून येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी जानेवारी २०१३ मध्ये एक परिपत्रक काढून कर्तव्यावर असताना चालक व वाहकांनी मोबाईल जवळ बाळगण्यावरही बंदी आणली आहे. दिवसेंदिवस प्रत्येक मार्गावरील वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. वाहनांची संख्याही दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. यातून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिवहन महामंडळाच्या मोबाईल वापरावरील बंदीमुळे चालक व वाहकावर चाप बसला आहे. परंतु चालक व वाहक छुप्या पद्धतीने मोबाईलचा वापर करताना दिसून येतात. कर्तव्यावर असताना मोबाईल आढळल्यास तो जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मोबाईल जप्तीसह दंडात्मक कारवाईचे प्रावधानही महामंडळाकडून करण्यात आले आहे. तरीदेखील तक्रारकर्ते समोर येत नसल्याने वाहक व चालकांचा मोबाईल वापर अद्यापही कमी झालेला नाही. अनेक शिक्षकसुद्धा तासंतास मोबाईलवर बोलताना दिसून येतात. नेर तालुक्यातील मोझर, मांगलादेवी, आजंती, चिखली, अडगाव, शिरसगाव, ब्राह्मणवाडा, माणिकवाडा, वटफळी, पाथ्रड आदी गावांमध्ये हा प्रकार सर्रास सुरू आहे. शिक्षकसुद्धा शिकविताना मोबाईलचा वापर करताना दिसून येतात. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना तासंतास उभे ठेवून मोबाईलवर वायफळ चर्चा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा दिवसागणिक वाढतच असल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र धास्तावले आहे. (तालुका प्रतिनिधी)
कर्तव्यावरील वाहनचालकांकडून मोबाईलचा वापर
By admin | Updated: February 16, 2015 01:53 IST