यवतमाळ : भाजपाच्या सदस्य नोंदणीबाबत शनिवारी झालेल्या आढावा बैठकीकडे पक्षाच्या पाच पैकी चार आमदारांनी पाठ फिरविली. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळाला. पश्चिम विदर्भ संघटक रामदास आंबटकर यांच्या अध्यक्षतेते ही आढावा बैठक झाली. जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार असताना केवळ उमरखेडचे आमदार राजेंद्र नजरधने या बैठकीला उपस्थित होते. अन्य चार आमदारांनी पाठ फिरविल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष पहायला मिळत होता. जिल्ह्यात भाजपाच्या सहा लाख सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यात भाजपाचे आमदार असलेल्या मतदारसंघांना प्रत्येकी एक लाखांचे उद्दीष्ट होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत जिल्ह्यात केवळ सव्वा ते दीड लाख सदस्य नोंदणी होऊ शकल्याने आंबटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाकडून केवळ सदस्य नोंदणीवर भर दिला जात आहे, विकास कामे व मतदारसंघातील एकूणच विकासाबाबत कुणी काहीच विचारत नसल्याने आमदारांच्या गोटात नाराजी असल्याचे सांगितले जाते. पक्षाच्या या कार्यप्रणालीबाबत लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांमध्येही विरोधी सूर ऐकायला मिळत आहे. आजच्या बैठकीलाही अल्प उपस्थिती असल्याने आंबटकर यांनी आपली नाराजी प्रगट केली. भाजपाच्या सदस्य नोंदणीचा परफॉर्मन्स पाहूनच विविध शासकीय-अशासकीय समित्यांवरील सदस्यांची नियुक्ती होणार असल्याचे आणि तसे पत्र मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.प्रभाग, बुथ, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्तरावर भाजपाच्या सदस्य नोंदणीचा परफॉर्मन्स तपासला जाईल, कमी असेल तेथील पदाधिकाऱ्यांना दूर करून नव्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. वणी, आर्णी, उमरखेड या तालुक्यातील सदस्य नोंदणीबाबत काहीसे समाधान व्यक्त करण्यात आले. त्याचवेळी अन्य तालुक्यातील सदस्य नोंदणीच्या गंभीर स्थितीबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांची आंबटकर यांनी झाडाझडती घेतली. सदस्य नोंदणी व पक्षबांधणीच्या अनुषंगाने तालुकानिहाय विस्तारकांची पदे निर्माण करण्यात आली असून त्याचे नियंत्रण जिल्हा सरचिटणीसांकडे राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजपाच्या बैठकीकडे चार आमदारांची पाठ
By admin | Updated: February 22, 2015 02:06 IST