यवतमाळ : शहरालगत असलेला भाग मागील ३० वर्षांपासून नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये येत नव्हता. त्याची यवतमाळ ग्रामीण अशी शासन दप्तरी स्वतंत्र नोंद होती. दोन वर्षापूर्वीच उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून हा भाग नगरपरिषदेत समाविष्ठ करण्यात आला आहे. मात्र मूलभूत सुविधा देण्यासाठी स्थानिक पातळीवर ठोस प्रयत्न होत नसल्याने येथील नागरिकांची परवड होत आहे. या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची अनेक वर्षांपासून भीषण समस्या आहे. याशिवाय नाल्या, रस्ते, शाळा, वीज पुरवठा, समाज मंदिर, रुग्णालय अशी कुठलीही अत्यावश्यक सेवा उपलब्ध नाही. तायडेनगर या मुस्लिमबहुल भागातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेवर मागील आठ महिन्यांपासून शिक्षक दिला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा एक ना अनेक समस्या या भागात निर्माण झाल्या आहे. यवतमाळ ग्रामीण ही ओळख मिटविण्यासाठी त्याला नगरपरिषदेत समाविष्ठ करण्यात आले. त्यानंतरही येथील समस्या कायम आहेत. नगरपरिषदेत आल्यानंतर पालिका प्रशासनाने येथील समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला नाही. इतर योजना येथे राबविण्यात येतात. या योजनांच्या माध्यमातून इतक्या वर्षांचा बॅक लॉग भरून काढणे शक्य नाही. त्यासाठी ठोण कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. अनेक वर्ष प्रशासनाच्या लेखी दुर्लक्षित असलेला यवतमाळ ग्रामीणचा परिसर विकासापासून कोसे दूर आहे. दाट लोकवस्ती असल्याने येथे इतर वॉर्डांच्या तुलनेत अधिक साधनसामग्रीची गरज आहे. प्रत्यक्ष समस्या पाहूनच नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने निवेदन देण्यात येतात. (कार्यालय प्रतिनिधी)
यवतमाळ ग्रामीण परिसरात सुविधांचा अभाव
By admin | Updated: February 16, 2015 01:54 IST