कॉपीमुक्ती अभियान : बोर्ड प्रतिनिधींनी घेतली बैठक यवतमाळ : येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची, तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने बुधवारी अमरावती शिक्षण मंडळाच्या प्रतिनिधींनी यवतमाळात परीक्षा प्रमुखांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या. बारावी आणि दहावीची परीक्षा पारदर्शकतेने पार पडावी म्हणून कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या सूचना बोर्डाने केल्या आहेत. त्या अनुषंगाने बुधवारी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्र प्रमुखांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. प्रथम २८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात १०२ केंद्र असून त्यावरून ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा ७ मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी १४७ केंद्र राहणार आहेत. या केंद्रांवरून जिल्ह्यातील ४२ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने बुधवारी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी दुर्गे यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र प्रमुखांना दिल्या. परीक्षा पारदर्शकतेने पाडण्याच्या सूचना केल्या. कॉपी झाल्यास थेट कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. या परीक्षेसाठी मंडळातर्फे व्हीडीओ पथक, बैठे पथक, भरारी पथक कार्यरत राहणार आहे. हे पथक जिल्ह्यात फिरणार आहे. केंद्रावर नियुक्त अधिकारी कॉपी बहाद्दरांवर कारवाई करणार आहे. यामुळे जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पूर्णत: पारदर्शकतेने परीक्षा होण्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तविली आहे. (शहर वार्ताहर) निकालाची टक्केवारी वाढली ४गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील उपद्रवी परीक्षा केंद्रांची संख्या कमी झाली आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कलही वाढला आहे. यासोबतच जिल्ह्याची निकालाची टक्केवारी वाढण्याससुद्धा या अभियानाचा लाभ झाला आहे.
२८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा
By admin | Updated: February 16, 2017 00:14 IST