लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना महामारीने जिल्ह्यात थैमान घातले होते. कोरोनाची दुसरी लाट तर अतिशय घातक ठरली. डेल्टा व्हेरिएन्टमुळे अनेकांना रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्या काळात आरोग्याची पूर्ण यंत्रणा कोलमडल्याचे चित्र होते. आता पुन्हा ओमायक्राॅन हा नवा विषाणू संसर्ग होत आहे. नागपूरमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत. त्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था आहे. संभाव्य संसर्ग लक्षात घेऊन तीन पटीने खाटांचे नियोजन केले जात आहे. याशिवाय गरज भासल्यास आरोग्य विभागाला पुन्हा मनुष्यबळही घेतले जाणार आहे.
प्रवासासाठी जाणारेच करतात तपासणी - कोरोनाच्या तपासणीवर आरोग्य विभागाचे कुठलेच नियंत्रण नाही. स्वत:हून नागरिक कोरोना चाचणी करण्यास पुढे येताना दिसत नाही. रेल्वे व विमान प्रवासासाठी आरटीपीसीआर तपासणी अहवाल सक्तिचा केला आहे. त्यामुळे ज्यांना प्रवासाला जायचे आहे, तेच स्वत:हून तपासणी करून घेतात. त्यामुळे रुग्ण पाॅझिटिव्ह आढळण्याचे प्रमाणही कमी आहे.
१७०० खाटा रुग्णांसाठी आरक्षित कोरोना महामारी संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून पुरेशी उपाययोजना करण्यात आली होती. त्यामुळेच दोन्ही लाटा यशस्वीपणे थोपविता आल्या. आता ओमायक्राॅन संसर्ग नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज केली जात आहे. सध्या एक हजार ७६५ खाटा आरक्षित आहेत. - डाॅ. तरंगतुषार वारेजिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ