यवतमाळ : बनावट दस्तावेजाच्या आधारे कर्जप्रकरणे दाखल करून तब्बल ३५ लाखाची उचल करण्याचा डाव बँक व्यवस्थापकाच्या सतर्कतेने उधळल्या गेला. हा गंभीर प्रकार उत्तरवाढोणा येथील सेंंट्रल बँक आॅफ इंडिया या बँक शाखेत उघडकीस आला. याप्रकरणी तब्बल २० जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सिद्धार्थ हिरामण साबळे रा.शिवाजी वार्ड लोहारा, उमेश मधुकर ढवळे रा.यवतमाळ, शेख लियाकत रा.यवतमाळ, रामलाल राठोड आणि त्याचे १६ साथीदार सर्व रा. दिघोरी अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिद्धार्थ साबळे याने उत्तरवाढोणा येथील बँक शाखेत एक लाख रुपये कर्ज मागणीचे प्रकरण सादर केले होते. त्याचप्रमाणे उमेश ढवळे याने दोन लाखांचे, शेख लियाकत याने पाच लाखाचे तर रामलाल राठोड आणि त्याच्या १६ साथीदारांनी संयुक्तपणे २६ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण सादर केले होते.
दस्तावेज पडताळणीदरम्यान लाखोंच्या या चारही कर्ज प्रकरणातील दस्तावेज बनावट असल्याचे सेंट्रल बँक आॅफ इंडिया उत्तरवाढोणा शाखेचे व्यवस्थापक अनिल कुमार यांच्या लक्षात आले. त्यांनी या दस्तावेजांची पुन्हा खातरजमा केली. त्यामध्ये विवीध विभागांनी ते बनावट असल्याचा अहवाल दिला. त्यावरून अनिल कुमार यांनी लाडखेड पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी स्वतंत्र तक्रारी दिल्या. ठाणेदार सतीश पाटील यांनी सिद्धार्थ साबळे,उमेश ढवळे, शेख लियाकत, रामलाल राठोड यांच्यासह २० जणांवर भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४७१ कलमान्वये फसवणूक, बनावट दस्तावेज तयार करणे आणि अफरातफरीचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. लाडखेड पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी शोध मोहीम राबविली आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागल्याने ते पसार झाले आहे. यामध्ये उत्तरवाढोणा येथील काही दलालही सक्रिय असल्याचे पोलिसातून सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)