यवतमाळ : राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावातील पाणी समस्या कायमची निकाली काढली जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणी निकषात काही शिथिलता आल्याने एकट्या यवतमाळ उपविभागातील १८ गावांची पाणीसमस्या सुटण्याच्या मार्गावर आहे. तब्बल ५ कोटी ४८ लाख १६ हजार रुपये खर्चून १८ गावात शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी नळयोजना साकारण्यात येत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने यापूर्वी फसलेल्या योजनांमधून आलेल्या अनुभवातून चुकांची सुधारणा करत नव्या दमाने काम हाती घेतले आहे. जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणात अपहार झाला. अनेक ठिकाणी गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य समितीवरच ठपका ठेवण्यात आला. याचे कारणही तसेच होते. लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार या गाव पातळीवरच्या समितीला देण्यात आले. अनेक वसूलपात्र रकमा मिळाल्या नाही. त्यामुळे शेवटी पालकमंत्री संजय राठोड यांच्या निर्देशावरून फौजदारी गुुन्हे दाखल करण्यात आले. यातील काही पाणी पुरवठा योजना या निकषाच्या जोखडातही अपूर्ण राहिल्या आहेत. आता मात्र या सर्व अनुभवांच्या गाठीवरूनच जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील यवतमाळ उपविभागातील कायमस्वरूपी पाणीटंचाईची झळ सोसत असलेल्या १८ गावांची समस्या सोडविण्यासाठी योजनेचे काम कार्यान्वित केले आहे. यामध्ये यवतमाळ तालुक्यातील भांब राजा येथे ४९ लाख १९ हजार, चांदापूर येथे २१ लाख २३ हजार, हिवरी येथे ५७ लाख ३५ हजार, वडगाव पोलीस स्टेशन येथे ४५ लाख ५८ हजार असे एक कोटी ७३ लाख ६२ हजार रुपयांची कामे केली जात आहे. यातील बहुतांश योजनेच्या कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले. याचप्रमाणे आर्णी तालुक्यातील चिचबर्डी येथे ३० लाख ३१ हजार, बेलोरा येथे १६ लाख ७२ हजार, ब्राह्मणवाडा येथे १५ लाख १४ हजार, कवठा बु. येथे १४ लाख ८७ हजार, चांदापूर येथे १५ लाख ४० हजार, पहुर (न.) येथे २० लाख एक हजार, पळशी येथे ३३ लाख ३६ हजार, सावळी सदोबा येथे ४६ लाख ३४ हजार, शेलू सेंदुरसनी येथे ३६ लाख ९० हजार, तरोडा येथे ३९ लाख ७० हजार, टेंडोळी येथे ३८ लाख ६२ हजार, वरूड येथे ११ लाख ८३ हजार, येरमल येथे ४० लाख २७ हजार असे तीन कोटी ५९ लाख ५६ हजाराची कामे केली जाणार आहे. बाभूळगाव तालुक्यातील शिंदी येथे १५ लाख ६० हजारांची नळयोजना तयार होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
पाच कोटींच्या नळयोजना निर्माणाधीन
By admin | Updated: February 16, 2015 01:51 IST