काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना पक्षातीलच नवतरुणांनी दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 03:08 AM2019-09-12T03:08:55+5:302019-09-12T03:09:29+5:30

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली पाच वर्षे शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय होते.

Congress leader Shivajirao Moghe challenged the party's new leaders | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना पक्षातीलच नवतरुणांनी दिले आव्हान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना पक्षातीलच नवतरुणांनी दिले आव्हान

googlenewsNext

यवतमाळ : सलग ४० वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्यापुढे आता पक्षातीलच नवतरुणांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या तिकिटासाठी मुंबई-दिल्लीपर्यंत संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतरही गेली पाच वर्षे शिवाजीराव मोघे आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात कमालीचे सक्रिय होते. गेल्या पाच वर्षात त्यांनी जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. भाजप व सेनेची साथ घेतली म्हणून त्यांना थेट पक्ष श्रेष्ठींच्या टीकेचे धनी व्हावे लागले. मात्र त्यांनी सत्तेचा हट्ट सोडला नाही. त्यासाठी वेळप्रसंगी पक्ष श्रेष्ठींचा आदेशही धुडकावला. गेल्या पाच वर्षात त्यांनी मुलाचे राजकीय पुनर्वसन करता येते का या दृष्टीनेही चाचपणी केली. त्यासाठी मुलाला मतदारसंघात सक्रिय केले. परंतु सध्या त्यांना पक्षातीलच काही नव्या तरुण चेहऱ्यांनी मतदारसंघातून आव्हान उभे केल्याने त्यांना यावेळी स्वत:च रिंगणात उतरावे लागेल असे दिसते. मतदारसंघातील बिघडलेले सामाजिक समीकरण व त्यातून बहुसंख्य असलेल्या मतदार बांधवांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. पक्षाच्या नव्या फिप्टी-फिप्टीच्या धोरणात शिवाजीरावांचे तिकीट कापले गेल्यास ते मुलाचा पत्ता पक्षापुढे फेकतील यात शंका नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आर्णी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मिळालेली ५७ हजार मतांची आघाडी मोघेंसाठी चिंतेची बाब ठरली आहे. मात्र या आघाडीत काँग्रेसचाच छुपा वाटा अधिक असेही बोलले जाते. शिवाजीराव रिंगणात असल्यास भाजपला आर्णीची लढत सोपी नाही एवढे निश्चित. कारण विद्यमान आमदाराविरोधात नाराजी आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होईल.

पाच वर्षांत काय घडले?

  • आर्णी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यात यश.
  • काँग्रेस-राष्टÑवादी व भाजप असे समीकरण जुळवून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे व आपल्या आर्णी मतदारसंघाकडे शिवाजीराव मोघे यांनी खेचून आणले.
  • कुठे भाजप तर कुठे शिवसेनेशी युती करून मोघे यांनी आर्णी नगरपरिषद, पंचायत समितीत सत्ता घेतली.
  • आमदार राजू तोडसाम यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार हंसराज अहीर यांना ५७ हजार मतांची आघाडी मिळवून दिली.
  • आमदार तोडसाम यांच्या कार्यशैलीवर पक्षातूनच अनेक घटक नाराज आहेत. त्यातूनच काही नव्या दमदार चेहऱ्यांनी भाजपच्या तिकिटासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे.


आमदार म्हणून राजू तोडसाम यांचा परफॉर्मन्स कोणत्याच पैलूने लक्षवेधक ठरत नाही. त्यांनी घाटंजी शहराला एक रुपयाचाही विकास निधी दिला नाही. अशीच स्थिती संपूर्ण मतदारसंघाची राहिली आहे. त्यांनी नेमका कोणता विकास केला हे दाखविण्याचे त्यांना आपण खुले आव्हान देतो. - शैलेश ठाकूर, नगर उपाध्यक्ष (शिवसेना), नगरपरिषद, घाटंजी

Web Title: Congress leader Shivajirao Moghe challenged the party's new leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.