सर्व १८ जागांवर विजय : शिवसेना समर्थित पॅनलचे पानीपतदिग्रस : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने १८ पैकी १८ ही जांगावर विजय संपादित केला. त्यांनी शिवसेना समर्थित पॅनलचा पराभव केला. माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात लढलेल्या काँग्रेसने विजय संपादीत केल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. सोमवारी येथील मातोश्री विमलदेवी चिरडे मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणीचा कौल हाती आला असून, संपूर्ण १८ ही जागांवर काँग्रेस समर्थित गटाने विजय संपादीत केला. या निवडणुकीत बहुउद्देशीय सहकारी संस्थेतून परमेश्वर गावंडे, आत्माराम जाधव, सतीश तायडे, अशोक देशमुख, विष्णू भनक, अनिल राठोड, रामेश्वर राऊत, नितीन जाधव, साहेबराव चौधरी, सत्यभामा चव्हाण, अल्का तुंडलवार हे सर्व ११ उमेदवार विजयी झाले. ग्रामपंचायत मतदारसंघातून लता इंगोले, सुदाम राठोड, राजू मोघे, राजेश हटकर तर अडते-व्यापारी मतदारसंघातून ओंकार खंडलोया, भाईलाल गड्डा आणि हमाल-मापारीमधून जगदीश नलगे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.व्ही. रणमले, सहाय्यक म्हणून के.बी. कुडमेथे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा
By admin | Updated: January 17, 2017 01:28 IST