दुुर्मिळ वन्यजीवांची शिकार : अवैध तोडीमुळे जंगल होतेय साफ यवतमाळ : येथील नवे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण यांच्यापुढे सागवानाची अवैध तोड, तस्करी आणि दुर्र्मीळ वन्यजीवांची शिकार रोखण्याचे आव्हान राहणार आहे. यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक व्ही. व्ही. गुरमे यांची नागपूर मुख्यालयी बदली झाली. त्यांची जागा आता नागपूर येथील कार्यआयोजनाचे मुख्य वनसंरक्षक जी. टी. चव्हाण घेणार आहे. यवतमाळच्या कार्यआयोजना उपवनसंरक्षकाची जागा गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त होती. ही जागासुद्धा आता भरण्यात आली असून तेथे नवीन सिंग यांना नियुक्ती देण्यात आली. व्ही. व्ही. गुरमे सुमारे तीन वर्षांपासून यवतमाळचे सीसीएफ होते. त्यांचे कार्यक्षेत्र वाशिम, अकाल्यापर्यंत होते. त्यांच्या कार्यकाळात सागवान तोड नियंत्रणात येऊ शकली नाही. आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. पैशाची भुरळ पडलेल्या वन खात्यातील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना फितूर करून तस्कर जंगल साफ करीत आहे.महाराष्ट्र-आंध्रसीमेवर पिंपळखुटी चेक पोस्टवर पकडल्या गेलेल्या अवैध सागवानाच्या ट्रकने ही बाब सिद्ध केली आहे. सागवान तस्करीतून लाखो रुपयांची उलाढाल केली जाते. त्या बळावरच वन अधिकाऱ्यांकडून हिवरी, जोडमोहा, सावळीसदोबा, पारवा, घाटंजी यासारखे ‘हेवी रेंज’ मिळविण्यासाठी रस्सीखेच चालते. अनेकदा त्यासाठी ‘रॉयल्टी’चे राजमार्गही स्वीकारले जातात. नंतर याच राजमार्गावरुन तस्कर व शिकाऱ्यांना साथ देऊन कितीतरी पटीने ‘अर्थ’कारणात भर घातली जाते. चिंकारा हरणासारख्या दुर्र्मीळ वन्यजीवांची खुलेआम कत्तल करून त्याचे मांस हैदराबादपर्यंत वातानुकूलित वाहनातून पोहोचविले जात असल्याची बाब यापूर्वीच वन खात्याच्या रेकॉर्डवर नोंदविली गेली. कोणत्याही रोडने यवतमाळात वरवर सागवानाची घनदाट झाडी दिसत असली, तरी प्रत्यक्षात काही मीटर आत गेल्यास जंगलाचे चक्क मैदान झाल्याचे चित्र पहायला मिळते. यवतमाळच्या कार्यआयोजना उपवनसंरक्षपदी नियुक्ती झालेल्या नवीन सिंग यांच्याकडूनही स्थानिक जनतेला अनेक अपेक्षा आहे. गेली कित्येक महिने हे पद रिक्त होते. यवतमाळच्या जंगलांमध्ये अनेक परिपक्व झाडे आहेत. त्याची तोड नित्यनेमाने केली जाते. परंतु त्याआड अपरिपक्व झाडांचीसुद्धा सर्रास कत्तल होते. मंजुरी दहा झाडांची आणि तोड हजार झाडांची, असे आतापर्यंतचे चित्र आहे. हे चित्र बदलविण्याची पर्यायाने जंगल संरक्षणाची जबाबदारी आता नवीन सिंग यांच्यावर आली आहे. चव्हाण व सिंग यांच्या कार्यकाळात अवैध वृक्षतोड, सागवान तस्करी आणि वन्यजीवांच्या शिकारीला लगाम बसेल, अशी रास्त अपेक्षा जिल्ह्यातील जनतेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)फितूरांचा शोध घ्यायवतमाळचे मुख्य वनसंरक्षक म्हणून जबाबदारी सोपविलेल्या जी. टी. चव्हाण यांच्याकडून जिल्ह्यातील वन्यप्रेमी व नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहे. त्यांनी प्रथम तस्करांशी हातमिळविणी करणाऱ्या आपल्याच खात्यातील ‘लखोबां’चा शोध घ्यावा, अशी जनतेची मागणी आहे. त्याशिवाय सागवान तस्करांवर नियंत्रण मिळविणे कठीण असल्याचा वनवर्तुळातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांमधील सूर आहे.
सीसीएफपुढे तस्करांचे आव्हान
By admin | Updated: January 17, 2017 01:19 IST