विधान परिषद निवडणूक : २०१० च्या पुनरावृत्तीची तयारी यवतमाळ : विधान परिषदेत आपल्यालाच मत मिळाले की नाही, याची खातरजमा करण्यासाठी थेट मतपत्रिकाच केंद्राबाहेर आणण्याचा आणि नंतर ती पुढच्या मतदारामार्फत पेटीत टाकण्याचा डाव रचण्यात आला आहे. २०१० च्या विधान परिषद निवडणुकीत हा प्रकार घडल्याने मतपेटीतून अनेक गुलाबी कागद बाहेर निघाले होते. त्याची पुनरावृत्ती यावेळीही करण्याची व्युहरचना राजकीय गोटात आखण्यात आली आहे. या व्युहरचनेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे जणू आव्हान उभे केले.१९ नोव्हेंबरला विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी निवडणूक घेतली जात आहे. शिवसेनेचे प्रा.तानाजी सावंत, काँग्रेसचे शंकर बडे रिंगणात आहेत. राष्ट्रवादी समर्थित अपक्षाने पाठिंबा दिला असला तरी नियोजित तारखेपूर्वी सरसकट माघार न घेतल्याने अपक्षाचेही नाव रेकॉर्डवर आहेच. अर्थात विधान परिषदेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. तर मतदारांची संख्या ४४० आहे. मतदानाची पद्धत क्लिष्ट असल्याने अवैध मतदान होण्याची आणि पाठींबा देऊनही वेळप्रसंगी अपक्षाच्या पारड्यातही मते पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बहुतांश मतदार पसंती क्रमानुसार यावेळी पहिल्यांदाच मतदान करीत आहे. त्यात नगरपंचायतींच्या मतदारांची संख्या १०२ एवढी आहे. त्यांचाच मतदान केंद्रांवर अधिक गोंधळ उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषदेचे काही सदस्य व पंचायत समितीच्या काही सभापतींचाही हा गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषदेचे हे मतदार आपल्या बाजूने राहावे म्हणून त्यांना ‘खूश’ करण्यात आले आहे. त्यानंतरही हे मतदार अखेरच्या क्षणी क्रॉस वोटींग करण्याची भीती राजकीय पक्षांना आहे. म्हणूनच यावेळीसुद्धा २०१० च्या विधान परिषद निवडणुकीतील डमी मतपत्रिका केंद्राबाहेर आणण्याचा फंडा वापरण्याचा विचार संबंधित राजकीय पक्षांच्या काही कार्यकर्त्यांकडून सुरू असल्याचे बोलले जाते.२०१० च्या या फंड्याची सन २०१६ च्या विधान परिषद निवडणुकीमध्ये होऊ घातलेल्या पुनरावृत्तीची ‘खास’ मतदारांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. मतदान प्रक्रियेचा भंग करणारा हा फंडा थांबविण्याचे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी आणि बाहेरुन आलेल्या उच्चपदस्थ निवडणूक निरीक्षण अधिकाऱ्यापुढे राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) एका मताचे नुकसान, पण मिळणाऱ्या सर्व मतांची होणार खात्रीपहिला मतदार जातानी अगदी मतपत्रिकेशी मिळता जुळता गुलाबी कागद सोबत नेईल, तेथे मूळ मतपत्रिका मिळाल्यानंतर ती छुप्या पद्धतीने घडी करून खिशात बाहेर आणेल. केंद्राधिकाऱ्याला आपण मतदान केले हे दाखविण्यासाठी तो गुलाबी कागद पेटीत टाकला जाईल. ती मतपत्रिका बाहेर आल्यानंतर दुसरा मतदार त्यावर आपला पसंतीक्रम (‘खूश’ करणाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्या नजरे समक्ष) नोंदवून मतदान केंद्रात जाईल. हा क्रम नोंदविलेली मतपत्रिका पेटीत टाकली जाईल. मात्र तेथे मिळणारी कोरी मतपत्रिका तो सोबत आणेल, नंतर पुन्हा पुढचा मतदार या मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून केंद्रात नेईल, तोसुद्धा त्याला मिळणारी मतपत्रिका बाहेर आणेल व पुढच्या मतदाराला देईल. असा हा फंडा त्या पक्षाच्या बाजूने असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत चालविला जाईल. या प्रकारामुळे ‘खूश’ झालेल्याने मत आपल्यालाच दिले याची हमी राहील आणि क्रॉस वोटींग होणार नाही याची खात्री राहील.
मतपत्रिका केंद्राबाहेर आणण्याचा डाव !
By admin | Updated: November 17, 2016 01:20 IST