राज्य सहकारी बँक : राष्ट्रीयकृत बँका ३५ टक्क्यातच यवतमाळ : तब्बल तीन महिने विलंबानंतर राज्य सहकारी बँकेने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २३० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. या कर्जामुळे जिल्हा बँकेची आर्थिक अडचण दूर झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी सुमारे ४०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करते. परंतु या कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेलाही राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे कर्ज मंजूर होते. परंतु यावर्षी हे कर्ज मिळण्यास जिल्हा बँकेला सुमारे तीन महिने प्रतीक्षा करावी लागली. जिल्हा बॅँकेने ३०३ कोटींच्या कर्जाची मागणी राज्य बँकेकडे नोंदविली होती. परंतु राज्य बँकेने हे कर्जच तत्काळ मंजूर केले नाही. इकडे पीक कर्ज मागणाऱ्यांच्या बँकेत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तरीही पैशाची मागणी वाढत असल्याने अखेर राज्य बँकेकडून गतवर्षीच्या कर्जावर वाढीव कर्ज मिळविण्यात आले. अखेर गेल्या आठवड्यात राज्य सहकारी बँकेने २३० कोटी रुपयांचे कर्ज जिल्हा बँकेला मंजूर केले आहे. बँकेची पीक कर्ज वाटपाची विस्कटलेली घडी राज्य बँकेच्या कर्जामुळे व्यवस्थित होणार आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ७५ टक्के अर्थात ३०६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. आणखीणही शेतकऱ्यांची कर्जाची मागणी सुरूच आहे. त्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचे वाटप अवघ्या ३५ ते ४० टक्क्यात असल्याचे सांगितले जाते. बँकेच्या कर्जाची वसुलीही ३०० कोटींवर पोहोचली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ९० कोटींचे पुनर्गठन जिल्ह्यात सुमारे २९ हजार शेतकऱ्यांच्या ९० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. राज्य शासनाने या कर्जाची हमी घेतली असून राज्य बँकेला ही रक्कम जिल्हा बँकेकडे वळती करण्याचे आदेश दिले आहे. या पुनर्गठित कर्जाचे वाटप अद्याप सुरू झालेले नाही. बँकेला ९० कोटी हवे असले तरी प्रत्यक्षात मागणी ही १५७ कोटीची असल्याचे सांगितले जाते. मात्र या ६७ कोटींच्या अतिरिक्त मागणी मागील रहस्य गुलदस्त्यात आहे. साखर कारखान्याला हवे आणखी कर्जपोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्यावर सध्याच २८ कोटींचे कर्ज आहे. या कारखान्याकडे सुमारे आठ कोटी रुपयांची साखर पडून आहे. त्याच्या विक्रीतून पैसा उभा होणार आहे. कारखाना परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात ऊस राहणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात कारखाना जोरात सुरू होण्याची अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहे. परंतु हा कारखाना सुरू करण्यासाठी आणखी ३५ ते ४० कोटी कारखान्याला लागणार आहे. त्यासाठी कारखान्याकडून जिल्हा बँकेकडे पुन्हा कर्जाची मागणी नोंदविली जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुसदचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहरराव नाईक यांनी सर्व संबंधितांशी बैठक घेऊन कारखान्याचे हित जोपासण्याचे आवाहन केल्याचे सांगितले जाते.
अखेर जिल्हा बँकेला २३० कोटी कर्ज मंजूर
By admin | Updated: July 11, 2016 02:10 IST