लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यांपासून संप सुरू केला आहे. यात सहभागी झालेल्या काही कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आली. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नऊही आगार आणि आस्थापना विभागातील एकूण ३९ महिला कर्मचारी कारवाईत अडकल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ, सेवा समाप्ती, बदली आदी प्रकारच्या कारवाईसह काही कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यवतमाळ विभागात एकूण ३५० महिला कर्मचारी आहेत. यामध्ये सर्वाधिक २४३ वाहक आहेत. प्रामुख्याने संपात चालक आणि वाहकांचा समावेश आहेत. त्यामुळे कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चालक-वाहकच आहेत. महिला वाहक कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विभागात महिला वाहकानंतर प्रशासनातील कर्मचाऱ्यांची संख्या (६९) आहेत. त्यांच्यापैकी काही महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यांत्रिक विभागात ३३ महिला कर्मचारी आहेत. पाच महिला अधिकारीही आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, यासाठी महामंडळाकडून अनेकदा संधी देण्यात आली. परंतू, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
१४४२ कर्मचारी संपातयवतमाळ विभागातील १४४२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. या विभागात एकूण २०७० कर्मचारी आहेत. यामध्ये सर्वाधिक चालक ७७७, तर वाहक ६०३ आहे. शिवाय प्रशासकीय विभागातील ३५५ आणि कार्यशाळेतील ३३५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संपामध्ये प्रशासकीय विभागातील ५०, कार्यशाळेतील २२६, चालक ६५९, तर ५०७ वाहक सहभागी आहेत.