यवतमाळ : गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हाती न लागलेल्या, न्यायालयात हजर राहून नंतर जामिनावरून पसार झालेल्या जिल्ह्यातील आरोपींची संख्या तब्बल साडेतीनशेंवर पोहोचली आहे. त्यात सर्वात जुना आरोपी हा २२ वर्षांपासून फरार आहे. पोलिसांकडून दरवर्षी पाहिजे-फरारी आरोपींची यादी अपडेट केली जाते. प्रत्येक पोलीस ठाण्याला त्यांच्या हद्दीतील फरार आरोपींची यादी देऊन शोध घेण्यास सांगितला जातो. परंतु वर्ष संपायला आले तरी पाहिजे-फरारी आरोपींच्या यादीतील आकडा कमी झाला नाही. अर्थात या यादीतील आरोपी अपेक्षेनुसार पोलिसांना सापडले नाहीत. या फरार आरोपींना पकडण्याची जबाबदारी पोलीस ठाण्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेची असते. परंतु गेली अनेक महिने या शाखेत खुर्चीचा खेळ सुरू होता. जुन्या अधिकाऱ्यांना हे आरोपी शोधण्यात अपयश आले. नव्याने रुजू झालेले अधिकारी आता कुठे स्थिरावत आहेत. ३५२ फरारी आरोपींमध्ये ५३ एकट्या यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. वडगाव रोड ३४ तर यवतमाळ ग्रामीण ठाणे हद्दीतून २२ फरार आहेत. ३५२ पैकी ८९ आरोपी गुन्हा घडल्यापासून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. वारंवार त्यांचा शोध घेऊनही पोलिसांना यश आले नाही. तर २६३ आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र त्यानंतर ते पुन्हा न्यायालयापुढे हजर झालेच नाही. अशा आरोपींमुळे न्यायालयातील खटले प्रलंबित राहतात. वारंवार वॉरंट निघूनही आरोपीचा थांगपत्ताच नसल्याने त्याची तामिली होत नाही. फरार आरोपींमध्ये कुणी २२ वर्षांपासून, कुणी १५ वर्षांपासून तर कुणी दहा वर्षांपासून आहेत. यात बहुतांश आरोपी हे भादंवि २७९, ३३७, ४२७, ३०४ (अ) या कलमातील आहेत. अर्थात अपघाताच्या घटनेनंतर परप्रांतीय वाहन चालकांना जामिनावर सोडले जाते. परंतु ते पुन्हा हजर होत नाहीत. अशाच आरोपींची संख्या अधिक असल्याने पोलिसांची पाहिजे-फरारींची यादी फुगली आहे. अनेकदा हे परप्रांतीय ट्रक चालक पोलिसांना आपली नावे खोटी सांगतात. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवानाही बनावट असतो. पोलीस या आरोपींच्या शोधार्थ गेले तरी त्यांचा ठावठिकाणा सापडत नाही. कारण नाव व पत्ताच चुकीचा असतो. अशा प्रकरणात पोलिसांचा वेळ व पैसा खर्च होतो. परप्रांतातील आरोपी वगळता अन्य फरार आरोपींची संख्याही बरीच आहे. मात्र त्यांनाही पोलीस शोधू शकलेले नाहीत. त्यात गंभीर गुन्ह्यातील आरोपींचाही समावेश आहे. स्थानिक रहिवासी असलेल्या या आरोपींचा थांगपत्ता पोलिसांना लागत नाही. यावरून पोलिसांचे नेटवर्क कमजोर असल्याचे दिसून येते. काही प्रकरणात चिरीमिरीच्या बळावर अशा आरोपींकडे डोळेझाक होत असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
३५२ आरोपींचा पोलिसांना शोधच लागेना !
By admin | Updated: December 2, 2014 23:13 IST