वाशिम : गत काही महिन्यांपासून रेशन दुकानांमधून तूरडाळ मिळणे बंद झाले असून, केवळ गहू व तांदळाचे वाटप पात्र लाभार्थींना केले जात आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत गोरगरीब लाभार्थींना अत्यल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. प्राधान्य गट, अंत्योदय अन्न योजना व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानांमधून दरमहा धान्य वितरीत करण्यात येते. लॉकडाऊन काळात उद्योग - व्यवसाय बंद असल्याने केंद्र शासनाने एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान प्राधान्यक्रम, अंत्योदयच्या कार्डधारकांना मोफत तांदूळ आणि गहू वितरित केले. दरम्यान, गत काही महिन्यांपासून वरिष्ठांच्या सुचनेनुसार रेशन दुकानांमधून तूरडाळ मिळणे बंद झाले आहे. जिल्ह्यात दोन लाख ७८ हजार १५० शिधापत्रिका असून, यामध्ये अंत्योदय ४८ हजार ९७०, प्राधान्य कुटुंब एक लाख ८१ हजार १०९, एपीएल शेतकरी २३ हजार ८५६ आणि केशरी रेशनकार्ड १४ हजार ७३९, पांढरे कार्ड नऊ हजार ४७६ अशा शिधापत्रिकांचा समावेश आहे. रेशन दुकानातून तूरडाळ मिळत नसल्याने लाभार्थींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
००००
रेशनवर गहू, तांदूळ मिळतो
रेशन दुकानातून सद्यस्थितीत लाभार्थींना गहू व तांदळाचे वाटप केले जात आहे. फेब्रुवारी महिन्यापासून गव्हाचे प्रमाण ५० टक्के कमी करून त्याऐवजी मका, ज्वारी देण्याचा विचार वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. रेशनवर केवळ गहू व तांदूळच मिळत असल्याने लाभार्थींमध्ये नाराजीचा सूर आहे. रेशन दुकानातून अन्य अन्नधान्यदेखील वाटप व्हावे, अशी अपेक्षा लाभार्थींमधून व्यक्त केली जात आहे.
००००
वाशिम जिल्ह्यात रेशन दुकानातून पात्र लाभार्थींना गहू व तांदळाचे वाटप करण्यात येते. वरिष्ठ स्तरावरूनच तूरडाळ वाटप करणे बंद झाले आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात केली जात आहे.
- सुनील विंचनकर
जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम
००००
एकूण शिधापत्रिका २,७८,१५०
पिवळे रेशनकार्ड ४८,९७०
केशरी, प्राधान्य कुटुंब १,९५,८४८
पांढरे रेशनकार्ड ९,४७६