इंझोरी : राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या येथील २१ वर्षीय युवकाचा १ ऑगस्ट रोजी वर्धा येथील रेल्वे रूळावर संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळून आला असून , त्याच्या कुटुंबियांनी मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, येथील अमोल रमेश दिघडे वय २१ वर्ष याने बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर जून महिन्यात राज्य राखीव दलाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाल्याने त्याची नागपूर येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. मागील २४ जुलै रोजी तो इंझोरी येथून नागपूरला प्रशिक्षणासाठी रवाना झाला होता. २५ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत नागपूर येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला पुढील प्रशिक्षणासाठी ३ ऑगस्ट रोजी दौंड येथे जायचे होते. ३१ जुलैच्या रात्री ८.३0 वाजता प्रशिक्षणस्थळी अमोलने सहकार्यासोबत भोजन घेतले. दुसर्या दिवशी १ ऑगस्ट रोजी सकाळी हजेरीमध्ये अमोलची अनुपस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे सकाळी १0 वाजता येथील त्याचे वडिल रमेश दिघडे यांना प्रशिक्षण केंद्रातून फोन आला की तुमचा मुलगा येथे अनुपस्थित आहे. तो इंझोरीकडे आला असेल त्याला तातडीने परत पाठवा ; अन्यथा त्याला नोकरीतून बाद केले जाईल. हे ऐकताच त्याचे कुटुंबीय चिंतातूर झाले. दरम्याल, याचदिवशी दुपारी १ वाजता वर्धा रेल्वे पोलीसांचा वडिलास फोन आला व अमोलचा मृतदेह सिंधी रेल्वे रूळावर कटलेल्या अवस्थेत असल्याची माहिती दिली. या बातमीने दिघडे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
** अमोल नागपूरला ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेत होता तेथे जेवण, झोपण्याची व्यवस्था होती. तसेच रात्रीच्या वेळी प्रशिक्षणार्थीस बाहेर जाण्यासाठी मज्जाव केला जात होता. असे असतानाही अमोल रात्रीच्या वेळी कसा बाहेर पडला ? व त्याचा मृतदेह चक्क वर्धा येथील रेल्वे रूळावर कसा काय आढळून आला? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
** अमोलने आत्महत्या केली तर मग मृतदेहाजवळ रक्त का नाही ?, मान व धड वेगवेगळी झाली मात्र इतर अवयवावर कुठेही जखमी दिसून आली नाही. त्यामुळे मृतकाच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केला