वाशिम : रेती व डब्बरची अवैध वाहतूक करणार्या सहा वाहन चालकांना महसूल अधिकारी व कर्मचार्यांच्या पथकाने रंगेहात पकडले. कारवाई आज २४ जून रोजी केल्याची माहिती तहसीलदार आशीष बिजवल यांनी दिली. २४ जून रोजी तहसीलदार बिजवल यांनी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्याविरूद्ध कारवाईसाठी पथक रवाना केले होते. या पथकामध्ये नायब तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार विजय खेडकर, तलाठी पी.आर. वैद्य, मंडळ अधिकारी मापारी, विजय नप्ते, के.एल. अवचार, तलाठी खडसे, तलाठी उईके यांचा समावेश होता. पथकाने दिवसभरात विविध ठिकाणी छापे टाकून सहा जणांवर कारवाई केली. यामध्ये म. जुबेर म. गौस यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये चालक सै. रियाज सै. ग्यासोद्दिन हा तीन ब्रास रेती वाहतूक करताना आढळला. सायखेडा येथील आत्माराम नंदु राठोड याच्या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास रेती आढळून आली. संदीप नारायण गावंडे यांच्या मालकीच्या वाहनामध्ये चालक सुरेश राजाराम गावंडे हा तीन ब्रास रेतीची वाहतूक करताना आढळून आला. उत्तम यलप्पा सोळंके यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरमध्ये परसराम यलप्पा सोळंके हा एक ब्रास डब्बरची वाहतूक करताना आढळून आला. जितेंद्र गोधा यांच्या मालकीच्या वाहनामध्ये शंकर मधुकर उंडाळ हा चालक एक ब्रास डब्बर वाहतूक करताना आढळून आला. मुन्नाभाई भवानीवाले यांच्या मालकीच्या वाहनामधून चालक तुळशिराम पुंजाजी मोटे हा गौण खनिजाची वाहतूक करताना आढळला; मात्र भवानीवाले व मोटे हे दोघे जन पंचनामा सुरू असताना महसूल पथकाला गुंगारा देऊन पसार झाले. त्यांच्यावर पोलिस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महसूल अधिकार्यांनी दिली. वाहन मालक व चालकांना नोटीस देण्यात आल्या असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल. दंड न भरल्यास त्यांच्यावरसुद्धा संबंधित पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बिजवल यांनी दिली.
सहा रेती तस्करांना महसूल अधिकार्यांचा हिसका
By admin | Updated: June 25, 2014 01:40 IST