ऑनलाइन लोकमत
अनसिंग (वाशिम), दि. १८ - प्रगटदिन सोहळयानिमित्त स्थानिक श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये शनिवारी हभप दासमधू महाराज लांजूड खामगाव यांचे काल्याचे कीर्तनाला सुरुवात होणार; तोच महाराजांना अचानक ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच महाराजांची प्राणज्योत मालवली.
अनसिंग येथील श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्यावतीने संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळ्यानिमित्त गत सात दिवसांपासून विविध कार्यक्रम सुरू होते. शनिवारी हभप दासमधू महाराज लांजूड यांचे काल्याचे कीर्तन होणार होते. सकाळपासूनच ‘श्रीं’च्या संस्थानमध्ये भाविकांची मांदियाळी सुरू झाली. सकाळी १० वाजताच्या सुमारास काल्याचे कीर्तन सुरू करण्यासाठी महाराज येणार; तोच महाराजांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. पुढील उपचारार्थ महाराजांना रूग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेमुळे भाविकांसह अनसिंग परिसरात शोककळा पसरली.