वाशिम, दि. १0- जिल्ह्यात पहिल्यांदाच वत्सगुल्म पर्यटन महोत्सव'चे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते २६ मार्च या कालावधीत होणार्या या महोत्सवाच्या यशासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनीदेखील यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार १0 मार्चला झालेल्या पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते.याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक मोरे, तहसीलदार बळवंत अरखराव यांच्यासह पर्यटन महोत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचे सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना द्विवेदी म्हणाले की, वत्सगुल्म महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रशासनाला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. सध्या महोत्सवाची पूर्वतयारी सुरू आहे. महोत्सव आयोजनाबाबत कुणाला काही सुचवायचे असल्यास त्यांच्या कल्पक सूचनांचे स्वागत आहे. तसेच या महोत्सवाच्या आयोजनातही नागरिकांनी पुढाकार घ्यावा व आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेला हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. महोत्सवासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व समितीच्या दैनंदिन सभा घेऊन पूर्वतयारीला गती देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी केल्या.'वत्सगुल्म महोत्सव' पुस्तिकेची निर्मिती'वत्सगुल्म महोत्सव'च्या निमित्ताने वाशिम जिल्ह्याचा इतिहास, पर्यटनस्थळे, अभयारण्ये, पक्षीवैभव, प्राचीन स्थळे व पौराणिक महत्त्व याविषयीची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. याकरिता उपविभागीय अधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये साहित्यिक, लेखक व पत्रकार यांचा समावेश करण्यात आला आहे.
पर्यटन महोत्सवाच्या यशासाठी प्रशासन प्रयत्नशील!
By admin | Updated: March 11, 2017 02:22 IST