..............
वाहतूक ठप्प; एस.टी. प्रवाशांची गैरसोय
मेडशी : राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. बुधवारी दुपारी याच कारणामुळे मेडशी-मालेगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊन एस.टी. प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
................
जऊळका येथील पाणीपुरवठा विस्कळित
जऊळका रेल्वे : गावात सार्वजनिक पाणीपुरवठ्याची प्रबळ व्यवस्था अद्याप उभी झालेली नाही. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष पुरविण्याची मागणी महादेव बरगट यांनी बुधवारी केली.
................
वीजपुरवठ्यात व्यत्यय; शेतकरी वैतागले
किन्हीराजा : परिसरातील अनेक गावांमधील शेतीला पुरविल्या जात असलेल्या विद्युतपुरवठ्यात वारंवार व्यत्यय निर्माण होत आहे. यामुळे विशेषत: फळबागा असलेले शेतकरी वैतागले असून, महावितरणने समस्या सोडविण्याची मागणी शेतकरी चंद्रकांत कुटे यांनी केली आहे.
.................
बीएसएनएलचे खांब हटविण्याची मागणी
वाशिम : मोबाइलचा वापर तुलनेने अधिक वाढला असून, दूरध्वनी बहुतांशी कालबाह्य झाले आहेत. असे असतानाही बीएसएनएलचे खांब उभे असून ते हटविण्याची मागणी अविनाश मुळे यांनी बुधवारी येथील भारत संचार निगम लि.च्या कार्यालयाकडे केली आहे.
.................
रेती घाटांचे लिलाव करण्याची मागणी
वाशिम : तालुक्यातील एकाही रेती घाटाचा गेल्या पाच वर्षांपासून लिलाव झालेला नाही. यामुळे घरांचे बांधकाम अडचणीत सापडण्यासोबतच घरकुले, शौचालयांच्या बांधकामावरही परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेता रेती घाटांचे लिलाव करण्याची मागणी मनसेचे मनीष डांगे यांनी बुधवारी केली आहे.
................
रस्ता दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’
वाशिम : पाटणी चौकातून अकोला नाकाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. खड्डे पडण्यासोबतच गिट्टी बाहेर निघाल्याने वाहने चालविणे कठीण झाले आहे. असे असताना दुरुस्तीचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ असून याकडे न.प.ने लक्ष देण्याची मागणी संदीप चिखलकर यांनी मंगळवारी केली.
................
देयके अदा करण्याचे आवाहन
वाशिम : जिल्ह्यातील ७० हजारांवर ग्राहकांकडे ४६ कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांनी केले.
.................
टंचाई गृहीत धरून पाण्याचे नियोजन
वाशिम : मार्च महिन्यानंतर शहरात पाणीटंचाई जाणवणार असल्याचे गृहीत धरून नगर परिषदेने आतापासून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
................
वाहतूक कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
वाशिम : शहरातील पोस्ट ऑफिस चौकातून गेलेल्या अकोला-नांदेड महामार्गावर दिवसभरातून अनेकवेळा वाहतूक विस्कळीत होत आहे. यादरम्यान वाहतूक कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे.