देशात मार्च, २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. अलीकडच्या काळात कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने लॉकडाऊनच्या नियमात आणखी शिथिलता आणली जात आहे. याला क्रीडा क्षेत्रही अपवाद नाही. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी संबंधित संस्था, संघटना यांना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (कंटेन्मेंट झोनबाहेर) स्पर्धा आयोजित करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याआनुषंगाने जिल्ह्यातही प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील खुल्या जागेत राज्य शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘एसओपी’नुसार सर्व स्तरांवर खेळणाऱ्या खेळाडूच्या प्रशिक्षणासाठी संबंधित संस्था, संघटना यांना स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जारी केले.
०००
कोरोनामुळे मागील दहा महिन्यांपासून क्रीडा क्षेत्र प्रभावितच होते. क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत जिल्ह्यात परवानगी मिळाल्याने खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होईल.
-गजानन वानखेडे
जिल्हाध्यक्ष, क्रीडा संघटना, वाशिम
0000
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास परवानगी दिली. यामुळे निश्चितच जिल्ह्यातील खेळाडूंना फायदा होईल, यात शंका नाही.
- विक्की खोब्रागडे,
जिल्हाध्यक्ष, क्रिकेट संघटना, वाशिम
००००
विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा बंद असल्यामुळे खेळाडूंना २०२० या वर्षांत आपले कर्तृत्व दाखविता आले नाही. आता क्रीडा स्पर्धेला परवानगी मिळाल्याने खेळाडूंमध्ये उत्साह आहे.
- सम्यक इंगळे,
खेळाडू, वाशिम