वाशिम: पावसाळ्यात ओढविणारी आपत्ती निवारण्यासाठी स्वत: चा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकार्यांनी दिलेले आदेश जिल्ह्यातील चारही नगरपालिकांनी चक्क धाब्यावर बसविले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी अद्याप एकाही पालिकेने हा आराखडा तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर केला नसल्याची माहिती हाती आली आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ९ मे रोजी जिल्ह्यातील नगरपालिका प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, तहसील प्रशासन पंचायत समिती प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पोलिस विभाग आदी महत्त्वपूर्ण विभागांच्या अधिकार्यांची बैठक घेतली. सदर बैठकीत जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराळे यांनी जिल्ह्यातील चारही नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना तत्काळ आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. सदर बैठकीच्या इतवृत्तातही याची नोंद आहे; मात्र धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील चार पैकी एकाही नगरपालिका प्रशासनाने हा आराखडा अद्याप तयार केला नाही. शिवाय मान्सूनपूर्व स्वच्छता व नाल्यांचे सफाई करण्याचे कामही सुरू केले नाही. यावरूनच पालिकांना आपत्ती व्यवस्थापनाची असणारी अँलर्जी अधोरेखित होते.
पालिकांचा आपत्ती व्यवस्थापन कृती आराखड्याला ‘खो’
By admin | Updated: June 25, 2014 01:40 IST