राजूरा : येथून २ किमी अंतरावरील अनसिंग ता.मालेगाव येथे २३ जून रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान दोन गटात झालेल्या सशस्त्र मारहाण प्रकरणा तील गंभीर जखमी असलेल्या डिगांबर दत्ता घोळवे (वय ५५) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २४ जूनच्या रात्री अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात घडली. या घटनेनंतर मालेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३0२ भादंविनुसार अतिरिक्त गुन्हय़ाची नोंद केली आहे. अनसिंग येथील एकाच समाजातील कायंदे व घोळवे कुटुंबीयांमध्ये गत काही दिवसांपासून शेताच्या धुर्यावरुन वाद सुरु होता. २३ जून रोजी दुपारी २ वाजता दरम्यान धुर्यावरील पाट खोदण्याच्या कारणावरुन दोन्ही गटातील काही लोकांमध्ये शेतात बाचाबाची झाली, त्यानंतर दोन्ही गटातील व्यक्ती गावात घरी परतल्यानंतर पुन्हा नव्याने वादाला तोंड फुटले व बाचाबाचीचे रुपांतर हातघाई येत भांडणामध्ये तलवारी लोखंडी गज व काठय़ांचा वापर झाला.यात दोन्ही गटातील काही जण गंभीर जखमी झाले होते. घटनेतील किरकोळ जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात तर एका व्यक्तीला खासगी रुग्णालयात भरती केले होते, त्यामधील सर्वोपचार रुग्णालयात उपचार होत असलेल्या डिगांबर दत्ता घोळवे यांचा २४ जूनचे रात्री ९.३0 वाज ता दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मालेगाव पोलिसांनी दिली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन मालेगाव पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. घटनेतील मनोहर कायंदे व राधेश्याम आंधळे यांना पोलिसांनी अटक करुन २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळवली होती. पोलिसांनी आरोपीकडून घटनादरम्यान वापरलेले रक्ताचे, डागांचे कपडे व गुन्हय़ात वापरलेली काठी जप्त केली आहे. डिगांबर घोळवे यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी भादंवि ३0२ नुसार गुन्हय़ांची नोंद केली असून, अधिक माहितीसाठी आता आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे. तपासाअंती दोन्ही गटातील आणखी काही लोकांची नावे आरोपीमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
जखमीचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल
By admin | Updated: June 26, 2014 02:25 IST