कोरोनामुळे एकमेकांच्या घरी जाणे, तसेच सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, तसेच लग्नाचे आयोजन करणे हे सर्व टाळले जात आहे, तसेच विनाकारण तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्याची संख्याही कमी झाली आहे. या कोरोनापासून ग्रामीण भागामध्ये विशेष काळजी घेतली जात असल्याचे शुकशुकाटामुळे दिसून येते. ग्रामीण भागामध्ये कोरोनाची भीती असली, तरी सर्दी, ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसली, तरी अनेक जण कोरोनाची तपासणी करून घेण्यास भीती बाळगत आहे. गावातील सर्वच व्यवसायांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. नागरिक फक्त महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावातील मुख्य बाजारपेठा, चौक, पार, छोटछोटे चहाचे स्टॉल, सलून दुकाने गर्दीने गजबजलेले असत. कोरोनाच्या भीतीने सर्वत्र शुकशुकाट आहे. शाळांना सुट्ट्या आहेत. परिसरातील विवाह, तसेच इतर शुभकार्य पुढे ढकलले आहेत, तर काही नागरिक विवाह सोहळे शॉर्टकटमध्ये उरकून घेत आहेत. शेलूबाजार परिसरातील आसपासच्या गावांची अर्थव्यवस्था या आठवडी बाजारावर अवलंबून आहे. छोटे व्यावसायिक, भाजीपाला, धान्ये-कडधान्य, शेतकी साहित्ये या आठवडी बाजारातूनच खरेदी केली जाते. आठवडीबाजार बंद झाल्याने आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा अक्षरश: स्फोट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंध लावले आहेत. येथील बाजारपेठ सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू आहे, परंतु दोन दिवसांपासून सकाळी होणारी गर्दी कमी झाल्याचे पाहावयास मिळाले.
गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात बदल झाला. त्यानंतर, मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात सर्दी, तापीने नागरिक ग्रासले होते. कोरोना चाचणी केली, तर पॉझिटिव्ह आल्यास कोविड सेंटर जावे लागेल, म्हणून बरेच लोक घरात गोळ्या औषधी घेऊन उपचार करून घेत आहेत. कोरोना चाचणी असो कि़ंवा लसीकरण यासाठी ग्रामीण भागातून पाहिजे त्या प्रमाणवर नागरिक पुढे येताना दिसत नाहीत. नांदखेडा या गावात गावकरी काळजी घेत असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे.