दीपक मोहिते राज्यात यंदा सर्वत्र पाऊस कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर, शहरी भागात वीज, पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. शहरी भागात दिवसागणिक वाढणारी लोकसंख्या व पाण्याची गरज यांचा ताळमेळ बसवणे, हे फार मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता या नैसर्गिक संकटाला सर्वांनी सामोरे जायला हवे. त्यासाठी ‘पाणी वाचवा’ ही लोकचळवळ व्हायला हवी. पालकमंत्री, सर्व तालुक्यांचे आमदार, महापौर, पंचायत समितीचे सभापती, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, खासदार, नगरसेवक, सरपंच, जि.प. सदस्य, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी एकत्र येऊन ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचवावी, यासाठी प्रयत्नशील राहायला हवे.पाण्याचा जपून वापर, वाहून जाणारे पाणी अडवणे, कोल्हापूर बंधारे, गावागावांतील तलावाचे संवर्धन तसेच घरगुती पाणीवापरावर काही प्रमाणात निर्बंध असे उपाय आतापासून केल्यास पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते. पालघर जिल्ह्यात भातशेती मोठ्या प्रमाणात होत असते. परंतु, १० वर्षांपासून पावसाचे प्रमाण दरवर्षी कमी होत चालले आहे. यंदा जिल्ह्यात सरासरी १००० मिमी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत भातशेतीची अवस्था बिकट झाली आहे. २० वर्षांत शासनाने या प्रश्नी कधीही गांभीर्याने विचार केला नाही. शहरी भागामध्ये नागरीकरणाला परवानग्या देताना पाण्याची उपलब्धता या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नागरीकरणासाठी सरसकट जमिनी मोकळ्या करण्यात आल्या. त्यामुळे १९९० मध्ये पाण्याच्या प्रश्नावरून शहरी व ग्रामीण असा संघर्ष उभा ठाकला. सुमारे २० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या ५ वर्षांत या उपप्रदेशाची लोकसंख्या २० लाखांच्या घरात पोहोचेल व पाणीटंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे.
‘पाणी वाचवा’ लोकचळवळ व्हावी!
By admin | Updated: September 14, 2015 03:44 IST