वसई : वसईतील ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना, जनतेची हक्काची एसटी महामंडळाची बससेवा आणि आयआयटी व निरीच्या अहवालाप्रमाणे ‘धरण तलाव’संदर्भात वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाविरोधात समीर वर्तक आणि मॅकेन्झी पीटर डाबरे यांनी वसई पश्चिम भागातील वाघोली येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता.वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व पर्यावरण संवर्धन समिती, वसई-विरारतर्फे सोमवारी सुरू झालेल्या या आंदोलनाला फादर ज्यो आल्मेडा, मौलाना सुबहान खान, फादर ज्यो डिमेलो, वसई-विरार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील आल्मेडा, वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे, जनता दल वसई शहराचे अध्यक्ष व्हॅलेंटाईन घोन्साल्विस, युवा भारतीचे शशी सोनावणे, जन आंदोलनचे बावतीस फिगेर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करून या बेमुदत उपोषणास समर्थन दिले. याप्रसंगी प्रसिद्ध पथनाट्यकार झुरान लोपीस व त्यांचे सहकारी डायगो लोपीस यांनी आंदोलनपर जनजागृती गीते सादर केली. या आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे.
या उपोषणाची दखल घेऊन वसई-विरार महापालिकेतर्फे दोन अधिकारी उपोषण मागे घेण्याच्या विनंतीसाठी आले होते. परंतु त्यांच्याजवळ कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.