घोराड : संताच्या नावाने असलेली शिक्षण संस्थेच्या शाळा प्रमुखाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी होवून १८ महिन्यांच्या कालावधी लोटला. तरीही चौकशी अहवालच तक्रारकर्त्यांला दिला नसल्याने या चौकशीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. घोराड येथील राजेंद्र देवराव राऊत यांनी संत केजाजी महाराज मूक बधिर शाळा घोराडचे शाळा प्रमुख बी. आर. गुडधे यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचा अर्ज नागपूर आयुक्त यांच्याकडे १६ आॅगस्ट २०१२ सादर केला. त्यानुसार नागपूर येथील विभाग आयुक्त यांच्या पत्रानुसार १२ सप्टेंबर २०१२ प्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. वर्धा यांनी तक्रारदारासमक्ष चौकशी करून अहवाल कार्यालयास पाठविण्याचा आदेश केला; मात्र चौकशी करण्यास टाळटाळ होत असल्याने तीन वेळा तक्रार कर्त्यांने स्मरण पत्र दिले. शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी २५ फेबु्रवारी २०१३ ला झाली. शाळा प्रमुखाने केलेल्या गैरव्यवहाराबाबतच्या मुद्यात छाया वंजारी विशेष शिक्षिका यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आली. सदर शाळेत एकूण पाच विशेष शिक्षक आहेत. २५ टक्केमधून एका शिक्षकाला प्रशिक्षित वेतनश्रेणी नियमाप्रमाणे देय असताना आर्थिक देवाण घेवाण करून दोन शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी सुरू आहे. शासनाच्या पैशाची नियमबाह्यपणे लुट सुरू आहे. शासनाकडून सदर शाळेला इमारत भाडे मिळते पण नियबाह्य लग्न समारंभाकरिता व तेंदुपत्ता ठेकेदारास भाड्याने दिली. याची तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही मुख्याध्यापकावर झाली नाही. अनिवासी विद्यार्थी व गैरअर्जदार विद्यार्थी हजर दाखवून वैद्यकीय अपंगाचे दाखले नसताना अशा विद्यार्थ्यांच्या नावावर हजारो रुपयाचे अनुदान लाटल्याचा आरोप तक्रारीतून केला आहे. शाळाप्रमुखाने खात्यातील रक्कम काढण्यापूर्वी अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष अथवा समाज कल्याण अधिकारी यांची कोणतीही पूर्व सूचना न घेता सदर व्यवहार स्वमर्जीने केल्याचे समोर आले आहे. शासनाकडून थकित वेतनेत्तर अनुदान घेणे होते. शाळा प्रमुखाने एकच अनुदान संंबंधित खात्याच्या संगणमताने पुन्हा उचलेले आहे. सदर शाळा प्रमुखाने मान्य संख्येपेक्षा विद्यार्थी नसताना खोटी विद्यार्थी संख्या दाखवून कोणतीही शिक्षण विभागाची पूर्व परवानगी न घेता पाचवा वर्ग गैरकायदेशीर सुरू केला होता. शाळा प्रमुखाने देणगीत आलेल्या वस्तूचे खोटे देयक लावून शासनाला लाखो रुपयाचा चुना लावल्याचाही आरोप आहे.(वार्ताहर)
शाळेच्या भष्ट्राचाराच्या चौकशी अहवालाची दीड वर्षापासून प्रतीक्षा
By admin | Updated: September 9, 2014 23:53 IST