वर्धा : विस्तारवादी नीतीमुळेच हिंसा व अशांती निर्माण होते. आज जगभरातील सरकार आपले सुरक्षा बजेट वाढवित आहे. नागरिकांपासून ते लपून नाही. यामुळे सर्वच उद्विग्न अवस्थेत आहे. ही अस्वस्था चिंंतनानेच दूर होईल. याकरिता वेगळ्या प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. शांती, अहिंसा, क्षमा, करुणा, मैत्रीच्या भावनेनेतूनच हे जग सुंदर बनविले जाऊ शकते, असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील भदंत आनंद कौसल्यायन अध्यासनाचे प्रभारी डॉ. सुरजित सिंह यांनी व्यक्त केले. जागतिक विश्वशांती स्तूप येथे ‘हिरोशिमा दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, अनुबॉम्बमुळे हिरोशिमात जो नरसंहार घडला त्याचा विचार आजही प्रत्येकाच्या मनास अस्वस्थ करतो. फ्युजिई गुरुजी मेमोरियल ट्रस्ट द्वारे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सर्वधर्म प्रार्थनेने झाली. नंतर अरुण कोथळे, रिंगने गुरुजी व सहकारी यांनी विश्वशांतीची भजने गायिली. या समारंभात जापानचे मोरिता गुरुजींनी मुख्य अतिथी डॉ. सुरजित सिंह यांना विश्व शांती प्रणेता फ्युजिई गुरुजींचे ‘शांती संदेश साहित्य’ भेट म्हणून दिले. मोरिता गुरुजींनी जापान मध्ये झालेली मनुष्य हानी व विश्व शांतीची गरज या विषयावर आपले विचार व्यक्त केले आणि लोकांना अहिंसक समाजाची गरज व्यक्त केली. योगायोगाने आजच्या दिवशी फ्युजिई गुरुजींचा जन्मदिवस असल्यामुळे उपस्थितांनी त्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. प्रास्ताविक संयोजक प्रा. अशोक मेहरे यांनी केली. कार्यक्रमात रे. फादर टॉमी, भरत महोदय, गोपाल दंढारे, मंसाराम, बिरेंजी, डॉ. हेमचंद्र वैद्य, गांधी विचार परिषद चे विद्यार्थी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
विस्तारवादी नीतीनेच हिंसा व अशांती
By admin | Updated: August 9, 2015 02:13 IST