राजेश भोजेकर - वर्धाविधानसभा निवडणुकीत जनतेने केवळ आपला नवा आमदार निवडला नाही तर बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत़ प्रस्थापित राजकारण हद्दपारीचा हा कौल आहे. हा कौल देतानाच त्याला विकासाची जोड अभिप्रेत आहे. वर्धा जिल्ह्यातील चारही मतदार संघात जनतेने अतिशय विचारपूर्वक आपले आमदार निवडले आहेत़ आता विकासाचेच राजकारण चालेल़ मग, तुमचा कितीही दांडगा राजकीय अनुभव असेल तर तो बाजूला ठेवा हेच यातून जनतेला सांगायचे असल्याचे हा निकाल गांभीर्याने विचारात घेतल्यास लक्षात येणारे आहे. आताच सावध झाले नाही तर राजकारण संपणार ही बाबही यातून अधोरेखित होणारी आहे. एकदा संधी दिली म्हणून दूसरीही संधी मिळेल असे कोणीही गृहीत धरून चालू नये, हेही यातून लक्षात घेण्यासारखे आहे. आणि निवडून दिल्यानंतर विकासाची तुमची तळमळ दिसत असेल तर कितीदाही निवडून दिले जाईल, हेसुद्धा या निकालातून जनता सांगून गेली आहे. ‘अब कोई उल्लू नही बना सकता’ ही बाब या निकालातून अप्रत्यक्षपणे अधोरेखीत झालेली आहे.आर्वी मतदार संघात २००४ मध्ये जनतेने अमर काळे यांना डोक्यावर घेतले होते. मात्र पाच वर्षात त्यांच्याकडून झालेल्या चुका जनतेला कदापि मान्य नव्हत्या. याचा प्रत्यय त्यांना २००९ मध्ये पराभवाच्या रूपात आला. आणि नवखा चेहरा दादाराव केचे यांना निवडून दिले. जी चूक अमर काळे यांनी केली तीच दादाराव केचे यांनीही केली. विकास दाखविण्याचा प्रयत्न केला. विकास दाखवायचा नसतो तो झाला असेल तर दिसतोच, हे दादाराव विसरून गेले. मग जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्यांनी आपल्या धडपडीतून मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करून आपण विकास केल्याचा कांगावा ते करू लागले. सत्य ते सत्यच ते जनतेपासून लपून राहिले नाही. याचीच फलश्रुती केचे यांना पराभवाच्या रूपाने लाभली. पाच वर्षात आमदार नसताना काळे यांनी संयमाने घेतले. पाय जमिनीवर ठेवून वावरले. यामुळे जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली. पुढील पाच वर्षही जनता अशीच ‘जागते रहो’ च्या भूमिकेत राहणार आहेत. हेच हा निकाल सांगून गेला. वर्धा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे यांनी जनतेला विकासाची सवय लावली होती. याच बळावर जनतेनी त्यांना तब्बल ३० वर्षे डोक्यावर घेतले. अखेर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेत पुत्र शेखर यांना निवडणूक रिंगणात उतरविले. त्यावेळी बंडखोरी झाली. तरीही जनतेने शेखर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली नाही. हे बदलाचेच संकेत होते. अपक्ष असतानाही सुरेश देशमुख यांच्यावर विश्वास टाकला. देशमुख यांनी विकास केला नाही, असेही म्हणता येणार नाही. पण ते आमदार असताना राज्यात आघाडीचे सरकार होते. ते त्या सरकारमध्ये सहभागी असल्यामुळे त्यांच्याकडून जनतेला मोठी अपेक्षा होती. सिंचनाचा प्रश्न बिकट झाला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आर्थिक व्यवहार अखंडपणे चालू ठेऊ शकले नाही, हे प्रश्न वर्धा मतदार संघातील जनतेच्या मनात घर करून होते. सुरेश देशमुख यांनी वर्धा शहरालगतच्या ११ गावांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि बँकेचे व्यवहार पूर्ववत होण्यासाठी प्रचंड जीवाचा आटापिटा केला. मात्र हे ते जनतेपर्यंत पोहचवू शकले नाही, यामुळेच जनतेच्या मनातला संभ्रम ते दूर करू न शकल्याने त्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. ही बाब निकालातून स्पष्ट होते. जनतेने डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने नवखा चेहरा निवडला. जी मंडळी मैदानात होती. त्यांच्या बद्दल जनतेला जाण होती. दरवर्षी तेच ते चेहरे दिसत होते. या निवडणुकीत डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने नवा चेहरा दिसला आणि जनतेनी त्यांच्यावर विश्वास टाकला. जनता प्रस्थापितांना कंटाळलेली आहे, असा हा कौल दिसून येतो.हिंगणघाटात वर्धेची पुनरावृत्ती झाली. मागील काही वर्षापासून येथील जनता विकासाला मुकली आहे. शिवसेना असो, राष्ट्रवादी असो त्यांच्या कार्यकाळात विकासकारण कमी आणि राजकारण अधिक झाले. आता बस्स झाले म्हणत जनतेने समीर कुणावार यांच्यावर विश्वास दाखविला. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी जनतेला हवा असलेला विकास केला असता तर जनतेनेही त्यांना साथ दिली असती, मात्र जनतेची आशा फोल ठरली म्हणून त्यांच्यावर अविश्वास दाखवून कुणावार यांच्या गळ्यात विक्रमी मतांनी विजयाची माळ घातली. देवळीत तब्बल चारवेळा रणजित कांबळे यांना जनतेनी डोक्यावर घेतले. ही निवडणूक ते हरतील असे वाटत होते. देशात मोदी लाट आणि महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट असल्यामुळे देवळीतही परिवर्तन होईल, असेच एकंदर चित्र होते. मात्र स्व. प्रभा राव यांनी बांधून ठेवलेला गड रणजित कांबळे यांनीही टिकवून ठेवला तो विकास कामांच्या जोरावरच! शेवटच्या फेऱ्या सुरू असताना त्यांचा पराभव होईल, असे लक्षात येताच देवळीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शेवटच्या फेरीत त्यांनी एकाएकी आघाडी घेत विजय मिळविल्याने साऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या आट्या कमी झाल्या आणि हसू फुलले. त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश वाघमारे यांना जनतेनी लोकसभेत आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. या संधीचे ते सोने करू शकले नाही. हीच खंत जनतेच्या मनात कायम घर करून होती. ही बाब त्यांना निकालापासून दूर नेणारी ठरली. परिवर्तनाची लाट असतानाही त्यांना अयशस्वी झुंज द्यावी लागली. चारही मतदार संघातील जनतेने दिलेला हा कौल बघता ही निवडणूक प्रस्थापित राजकारणाला कंटाळून कलाटणी देणारी ठरली, हे लक्षात येते.
प्रस्थापित राजकारणाला कलाटणी
By admin | Updated: October 20, 2014 23:17 IST