वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारपर्यंत तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले़ जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवकांसाठी सेलसूरा येथे आयोजित प्रशिक्षणात भरडधान्य ज्वारी मुल्यवर्धन प्रक्रिया तंत्रज्ञानाची इत्यंभूत माहिती देण्यात आली़ यात वर्धा, देवळी आणि हिंगणघाट तालुक्यातील एकूण ४० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़अध्यस्थानी डॉ. सुरेश नेमाडे तर अतिथी म्हणून शीतल मानकर, दीपक पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते़ प्रशिक्षण संयोजक म्हणून प्रा. उज्वला सिरसाट यांनी काम पाहिले़ प्रास्ताविकातून प्रा़ सिरसाट यांनी ज्वारी हे महत्त्वाचे आणि पौष्टिक भरडधान्य आहे़ काही कारणास्तव जिल्ह्यात ते दुर्लक्षित होऊन उत्पादकता घटत आहे़ या पिकाची उत्पादकता वाढविणे, ज्वारी प्रक्रियेद्वारे पीठ, रवा, हुरडा, पापड, पोहे, लाह्या, सिरप, गुळ, अल्कोहोल, बिस्किट, ब्रेड, कुरडी, शेवळ्या आदी पदार्थ निर्मितीचे सुधारित यांत्रिकीकरण, ज्वारीची गुणवत्ता, पोषकता व बाजारपेठेची मागणी वाढविणे, एकात्मिक ज्वारी पीक व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्र, मुल्यवर्धन प्रक्रिया व विक्री याबबात शास्त्रोक्त मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. ज्वारी संशोधन केंद्र अकोलाचे शास्त्रज्ञ डॉ. आर.बी. घोराडे यांच्या हस्ते सेलसुरा येथील प्रक्षेत्रावर ज्वारी भरडधान्य प्रक्रिया युनिटचे उद्घाटन झाले. सदर युनिट अंतर्गत प्राथमिक प्रक्रियेसाठी डिस्टोनर आणि डिहलर तसेच फ्लोर शिफ्टर व पलव्हराईझर मशनरीद्वारे ज्वारी प्रक्रिया प्रात्यक्षिक प्रशिक्षणार्थींना पाहता आले. डॉ. घोराडे यांच्यावतीने प्रशिक्षणार्थींना ज्वारी पिकाबाबत शास्त्रोक्त मार्गदर्शन व प्रक्रिया क्षेत्रातील ज्वारीचे पर्यायी उपयोग विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले़ त्यांच्याद्वारे विकसित व प्रसारित नवीन ज्वारी वाण सी.एस.एच़ ३५ ची माहिती देण्यात आली़ यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. घोराडे यांना गौरविण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले़ प्रा. रेखा ठाकरे यांनी उपरोक्त भरडधान्य प्रक्रियेच्या यंत्राबाबत माहिती दिली़ ज्वारीपासून सहज व कमी खर्चाच्या प्रक्रियायुक्त पदार्थाचे प्रात्यक्षिक देण्यात आले़ सहा.प्रा. निलीमा पाटील यांनी भरडधान्य योजनेंतर्गत मुल्यवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. भरडधान्य ज्वारीचे पोषणमूल्य व मुल्यवृद्धीचे महत्त्व आणि उत्पादित मालावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रियाद्वारे मुल्यवर्धन करण्यासाठी सदर योजनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले.(कार्यालय प्रतिनिधी)
भरडधान्य ज्वारी मूल्यवर्धन प्रक्रिया तंत्रज्ञानावर प्रशिक्षण
By admin | Updated: February 22, 2015 01:54 IST